काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेमध्ये आहेत. तामिळनाडूनमधून सुरु झालेली यात्रा आता केरळमधून कर्नाटकमध्ये पोहचली आहे. या यात्रेदरम्यानचे राहुल गांधी यांचे अनेक फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. कधी लहान मुलांना जवळ घेतलेला फोटो, तर कधी पावसात भिजतानाचा फोटो व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
नुकताच त्यांचा सोशल मिडियावर ऊस खातानाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. राहुल गांधी यांच्या फिटनेससोबतच आता त्यांच्या दातांच्या मजबुतीबद्दलही बोलले जाऊ लागले आहे. पण त्याचवेळी भाजपकडून मात्र या फोटोची खिल्ली उडविण्यात आली आहे.
भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राहुल गांधी यांच्या या फोटोवर टोला लगावला आहे. भातखळकर यांनी ट्विट करत, “राहुल गांधी पंतप्रधान झाले नाहीत, होणारही नाहीत. पण विको वज्रदंतीचे ब्रँड ॲम्बेसडर नक्की होतील,” असा टोला लगावला आहे.
राहुल गांधींची भर पावसात सभा :
नुकतचं राहुल गांधी यांचा भर पावसात भाषण करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राहुल गांधी यांनी मैसूरमधील एपीएमसी मैदानावर एका सभेला संबोधित केले. त्यांचं भाषण सुरू असतानाच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पण भर पावसात त्यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. राहुल गांधी यांच्या पावसातल्या या सभेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा कर्नाटकात, भाजप-आरएसएसवर टीकास्त्र
या सभेत राहुल गांधींनी सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकास्त्र डागलं. ते म्हणाले, “भारत जोडो यात्रा कर्नाटकात पोहोचली आहे. नदीप्रमाणे ही यात्रा कन्याकुमारीपासून कश्मीरपर्यंत चालेल. या नदीत तुम्हाला हिंसा, द्वेष दिसणार नाही. फक्त प्रेम आणि बंधूभाव दिसेल. ही यात्रा थांबणार नाही. आता बघा पाऊस येत आहे. पावसालाही यात्रा रोखता आलेली नाही. भाजप-आरएसएसने जो द्वेष देशात भरला आहे, त्याविरोधात ही यात्रा आहे.
ADVERTISEMENT