पुणे : भाजपच्या ज्येष्ठ आमदार मुक्ता टिळक यांचं आज (गुरुवारी) प्रदीर्घ आजाराने निधन झालं. त्या ५६ वर्षांच्या होत्या. मागील काही दिवसांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. अखेर आज पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या (शुक्रवारी) सकाळी ९.०० ते ११.०० या वेळेत त्यांचं पार्थिव ‘केसरी वाडा’ या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता वैकुंठ स्मशामभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ADVERTISEMENT
मुक्ता टिळक या पुण्यातील ‘कसबा पेठ’ मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार होत्या. राज्य भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी त्या एक होत्या. पुण्याच्या नगरसेविका, महापौर आणि आमदार अशी त्यांची चढती राजकीय कारकिर्द होती. पुणे महानगरपालिकेमध्ये वर्ष २०१७ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर त्या भाजपच्या पहिल्या महापौर बनल्या होत्या. २०१७ ते २०१९ या काळात त्यांनी महापौरपद भूषवलं.
मुक्ता टिळक यांचा अल्प परिचय :
मुक्ता टिळक या लोकमान्य टिळक यांच्या पणतू सून होत्या. शैलेश टिळक यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांचं शालेय शिक्षण पुण्यातील भावे स्कूलमध्ये तर पदवीच शिक्षण प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयातून घेतलं. मानसशास्त्र या विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली होती. पुढे त्यांनी एमबीएचंही शिक्षण घेतलं.
सन २००२ मध्ये मुक्ता टिळक यांनी पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून प्रवेश केला. पुणे महापालिका निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान त्यांच्या नावावर आहे. महापालिकेत स्थायी समितीच्या सदस्या, महापौर या जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच २०१९ मध्ये भाजपनं कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली आणि त्या आमदार म्हणून निवडून आल्या.
ADVERTISEMENT