मुंबई: भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून म्यॉव म्यॉव आवाज काढून टिंगल केली होती. ज्यामुळे आज (27 डिसेंबर) शिवसेनेचे आमदार आणि नेते सभागृहात चांगलेच आक्रमक झाले. यावेळी भास्कर जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेत नितेश राणेंना निलंबित करण्याची माणगी केली. एवढंच नव्हे तर त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांवर देखील यावेळी टीका केली.
ADVERTISEMENT
नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंची टिंगल करुन शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याचं यावेळी अनेक आमदारांनी म्हटलं. त्याचवेळी मागील अधिवेशनात अभिरुप विधानसभेत बोलताना नितेश राणेंनी जे भाषण केलं होतं त्यावर आक्षेप घेत भास्कर जाधवांनी भाजपवर तुफान टीका केली.
पाहा भास्कर जाधव सभागृहात नेमकं काय म्हणाले:
‘विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून भाजपचे आमदार निषेध करत होते. त्यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जात असताना त्यांच्या एका सदस्याने आवाज काढला होता. सुनील प्रभूंनी त्याबाबत सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता. मी तेव्हा सभागृहात नव्हतो. पण ती सगळी क्लिप मी नंतर पाहिली.’
‘सुनील प्रभूंनी तो विषय मांडला. विरोधी पक्षांनी त्यावर सांगितलं की, त्यावर असं घडता कामा नये. त्यावेळी हा विषय जवळजवळ संपल्यात जमा होता. पण त्याचवेळी सुधीर मुनगंटीवार हे उठले आणि त्यांना ते खटकलं. त्यांना ते सहन झाला नाही. ते म्हणाले की, हा विषय एवढ्या सहजपणे घेऊ नका. हे सगळं मी क्लिपवर पाहिलं. माझा मुद्दा वेगळा आहे देवेंद्र फडणवीस साहेब.’
‘काळ का सोकावला हे मी आज सांगणार आहे. मागच्या वेळेला जेव्हा तुमचे 12 आमदार निलंबित झाले तेव्हा योगायोगाने मी चेअरवर होतो. त्यावेळी पायऱ्यांवर आपण अभिरुप विधानसभा भरवली. त्यावेळी नितेश राणे म्हणाले, चंद्रकांतदादांना उद्देशून.. ‘दादा मी असंसदीय शब्द बोलतोय.. भास्करराव जाधव म्हणजे काय त्याला कोणी तरी सांगितलं दोन बिस्किटी देतो. जा त्याला चावून ये. तो चावून येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव.’ असं नितेश राणे त्यावेळी म्हणाले.’
‘आज मला दादांना, देवेंद्र फडणवीसांना आणि माजी अध्यक्ष हरिभाऊंना प्रश्न विचारायचा आहे. जर मला दोन बिस्किटी घालून कोणाला चावायला सांगितलं तर मी कुत्रा असेन.. तर मी असं म्हणणार नाही.. त्याचवेळी आमदार नितेश राणेंना विचारलं पाहिजे होतं. जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार भांडत होते. तेव्हा हरिभाऊ बागडे यांनी 19 जणांना सस्पेंड केलं होतं. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी किती बिस्किटं खायला घातली होती?’
‘हे चंद्रकांतदादांनी विचारलं पाहिजे होतं. यांच्यामुळे काळ सोकावला होता. नानांनी विचारलं पाहिजे होतं. यांनी त्यांना वेळीच रोखायला पाहिजं होतं.’
‘त्याचवेळेस हरिभाऊंनी, चंद्रकांत पाटलांनी, देवेंद्र फडणवीसांनी विचारायला पाहिजे होतं की, नितेश राणेंना की तुम्ही असं का म्हणता? एकीकडे हेच लोकं म्हणतात टिंगलटवाळी करु नका. तरीही यांचे सदस्य म्हणतात की, मी हजार वेळेस नक्कल करेन. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही. काळ इथे सोकावला. त्या दिवशी रोखलं असतं तर काळ सोकावला नसता.’
Maharashtra Vidhan Sabha Live : ‘म्याऊ- म्याऊ’वरून घमासान, नितेश राणेंच्या निलंबनासाठी शिवसेना आक्रमक
‘मला माफी मागायला लावली तुम्ही आणि परवा जे झालं ते तुम्ही थोडक्यावर घेऊन जाता. हे कसं शक्य आहे. म्हणून या नितेश राणेंना निलंबित करा किंवा सभागृहात हात जोडून माफी मागायला सांगा.’ असं म्हणत भास्कर जाधवांनी भाजपवर जोरदार टीका केली.
ADVERTISEMENT