दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: भाजप आमदार नितेश राणे यांना उपचारासाठी आता कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमधील तुळशी इमारतीमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सीपीआर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी गिरीश कांबळे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
नितेश राणे यांच्यावर उपचार करण्यासाठी सीपीआर हॉस्पिटल मधील तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार केली आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय अधिकार्यांचा समावेश आहे. विशेषतः हृदयरोग, अस्थिरोग तज्ज्ञ यांचाही समावेश यात केलेला आहे. दरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व तपासण्या करण्याचे काम झालेले असून त्याचे रिपोर्ट येणं बाकी आहे.
दरम्यान सीपीआर हॉस्पिटल प्रशासनाने दक्षता घेतली असून कोल्हापूर पोलिसांचा हॉस्पिटलमध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आमदार नितेश राणे यांना कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल मधील बाह्यरुग्ण विभागातील तपासण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना तुळशी या इमारतीत असणाऱ्या कार्डियाक म्हणजेच हृदय विभागाच्या तपासणीसाठी आणण्यात आलं. अर्धा तासात यांच्यावरती या ठिकाणी हृदयाची तपासणी केल्यानंतर त्यानंतर अॅडमिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणात सहभागी असल्याचा ठपका असणारे भाजप आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते कोर्टाला शरण गेले होते. त्यानंतर त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दुसरीकडे कोर्टाने पोलीस कोठडी वाढवून देण्यास नकार दिल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याता आली होती. पण तेव्हापासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तुरुंगाऐवजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आता नितेश राणेंना कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय अर्थात सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांनी सिंधुदुर्ग पोलिसांचा ताफा त्यांना एका सरकारी रुग्णवाहिकेतून घेऊन सीपीआरमध्ये घेऊन आलं होतं. यावेळी सीपीआर हॉस्पिटलमध्ये कोल्हापूर पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
भाजप आमदार नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी
यावेळी कोणत्याही कार्यकर्त्याला आमदार राणे यांच्याजवळ जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता. यावेळी सिंधुदुर्ग पोलिसांनी कडं करत नितेश राणे यांना अपघात व बाह्यरुग्ण विभागात दाखल नेलं. इथे त्यांच्यावर सध्या हृदयाच्या आणि मणक्याच्या तपासण्या करण्यास सुरुवात झाली आहे. सीपीआर हॉस्पिटल प्रशासनाच्या तज्ज्ञ डॉक्टरांची दोन पथकं त्यांच्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. आमदार नितेश राणेंवर आता औषधोपचार आणि तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, मंगळवारी नितेश राणेंच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी कोर्ट नेमका कोणता निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT