भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा आदित्य ठाकरे यांना डिवचलं आहे. दहीहंडी उत्सवानिमित्त राणे वरळी येथे आले होते. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात येऊन थेट त्यांच्यावर नितेश राणेंनी निशाणा साधला आहे. सध्या दहीहंडी उत्सवात राजकीय नेते एकमेकांवर टोलेबाजी करायची संधी सोडत नाहीयेत. पेंग्विन पार्कमध्ये कसं पाठवायचं हे आम्हाला माहिती, असं नितेश राणे म्हणाले.
ADVERTISEMENT
काय म्हणाले नितेश राणे?
“वरळीत कोणीही भाजपला आव्हान देण्याची हिमंत करु नये. पेंग्विन पार्कमध्ये कसं पाठवायचं हे आम्हाला माहिती. विधानसभेच्या पायऱ्यांवर साधा मी म्यांव म्यांव आवाज काढल्यावर काय अवस्था झाली, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहीली आहे. त्यामुळे उगाच डरकाळी मारण्याचा प्रयत्न कोणी करु नये. मुंबई काही कोणत्या साहेबांची नाही मुंबई असंख्य मुंबईकरांची आहे, हे लक्षात ठेवा,” असे नितेश राणे म्हणाले.
काय आहे म्यांव, म्यांव प्रकरण?
राणे कुटुंबीय ठाकरे परिवारावर थेट निशाणा साधतात. अनेकवेळा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर राणे कुटुंबीय उघड उघड टीका करतात. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणापासून नितेश राणे हे आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत आहेत. हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजप सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन करीत असताना आदित्य ठाकरे जात होते, त्यावेळी आमदार नितेश राणे यांनी म्यांव, म्यांव म्हणत त्यांना चिडवण्याचा प्रयत्न केला होता.
त्यानंतर नितेश राणे यांना निलंबित करण्याची मागणी शिवसेनेच्या आमदारांनी केली होती. एकेकाळी शिवसेना वाघाप्रमाणे डरकाळ्या फोडण्यासाठी प्रसिद्ध होती. पण आता शिवसेनेची अवस्था म्याव म्याव करणाऱ्या मांजरीसारखी झाली आहे. यामुळेच शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंना बघून म्याव म्याव आवाज काढला; असे नितेश राणे यांनी सांगितले.
ADVERTISEMENT