उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार गोपाळ शेट्टींनी केलेल्या एका विधानाचे वेगवेगळे अर्थ लावले गेल्यानं नवा मुद्दा चघळला जात आहे. शेट्टींनी एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारला घरचा आहेर दिल्याचंही बोललं गेलं. मात्र, हे सगळं खासदार गोपाळ शेट्टींनी फेटाळून लावलं.
ADVERTISEMENT
‘मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या मैत्रिणीच्या मुलीला एक कोटींचं बक्षीस आणि इतर शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांना सरकार घर देत नाही,’ या गोपाळ शेट्टींच्या विधानाची बरीच चर्चा झाली. त्यावर आता खासदार गोपाळ शेट्टींनी सविस्तर खुलासा केलाय.
भाजप खासदार गोपाळ शेट्टी आधी काय म्हणाले होते?
“महाराष्ट्र विधानसभेत होतो, तेव्हापासून यासाठी प्रयत्न करतोय. या तिघांनाही शिवछत्रपती पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी घर मागितलं, तर सरकार देत नाही आणि कबड्डीपटूंमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या मैत्रिणीची मुलगी होती. तिला सुवर्णपदक मिळालं, तर तिला एक कोटी रुपये देण्यात आले, ही कुठली पद्धत आहे?”, असा सवाल गोपाळ शेट्टी उपस्थित केला.
“म्हणजे कोणाची ओळख मंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांशी असेल, तरच त्यांना बक्षीस मिळणार का? तुम्ही (सरकारने) एक मार्गदर्शक नियमावली बनवा. ज्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाले आहेत, त्यांना पूर्वी काळी फ्लॅट दिले गेले आहेत. तेव्हा जर तीनशे फुटांचं घर दिलं होतं, आता व्यवस्था मोठी झालीये, सरकार विस्तारलं आहे, ५०० फुटांची जागा द्या, काय फरक पडतो?”, असंही गोपाळ शेट्टी म्हणाले.
भाजप खासदार गोपाळ शेट्टींनी काय केला खुलासा?
विधानांचे वेगवेगळे अर्थ लावले जात असल्यानं गोपाळ शेट्टींनी खुलासा केला. ते म्हणाले, “माध्यमांनी चुकीची बातमी चालवली. स्वपक्षीय भाजप-बाळासाहेबांची शिवसेना सरकारवर गोपाळ शेट्टींनी हल्ला केल्याच्या बातम्या चालवल्या. मला ओळखणाऱ्या लोकांना माहितीये की, मी कधी चुकूनही काँग्रेसवरही हल्ला केलेला नाहीये. मग मला मोठं केलं, त्या पक्षावर हल्ला करण्याची बातमी दाखवणं मुर्खाच्या नंदनवनात वावरण्यासारखं आहे.”
गोपाळ शेट्टी पुढे असंही म्हणाले की, “माझ्या भाषणात त्यांचा उल्लेख आहे. विधानसभेत होतो, त्यावेळी भाषण केलं होतं. हा मुद्दा मी ज्यावेळी उपस्थित केला, तो वर्तमानपत्रात छापून आलेला आहे. त्यावेळी महिला कबड्डीपटूंना सुवर्ण पदक जिंकल्यामुळे 1 कोटींचं बक्षीस दिल्याची बातमी आली होती. त्यावेळी मी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता.”
“माझ्या भाषणात मी हेही बोललो की, नंतर मी माझ्या मंत्र्यांना जाऊन भेटलो. त्यावेळी विनोद तावडे यांना भेटलो होतो. त्यांनी मला सांगितलं की, त्याला कोर्टाने स्थगिती दिलेली आहे. न्यायालयाने त्यावेळी हे सांगितलेलं की तुम्ही यासाठी मार्गदर्शक नियमावली बनवा. ती नियमावली अजून झालेली नाही”, अशी माहिती गोपाळ शेट्टींनी दिली.
“त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्नीच्या मैत्रिणीच्या मुलीला दिलं म्हणून माझा वाद नाही. कारण ओळखीचा लाभ असतोच. माझा मुद्दा इतकाच होता की, जसं तिला दिलं, तसं इतरांनाही द्यायला हवं होतं”, अशी भूमिका गोपाळ शेट्टींनी खुलासा करताना केला आहे.
“एकनाथ शिंदेंचं नाव यामध्ये गोवण्यात आलं. एकनाथ शिंदे आणि माझ्या राजकीय कारकीर्दीत 5 वर्षांचा फरक आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांना भेटलो होतो. सह्याद्री अतिथीगृह येथे भेटायला गेल्यानंतर त्यांनी गाडीतून उतरून माझी भेट घेतली”, असा अनुभव गोपाळ शेट्टींनी या मुद्द्यावर भाष्य करताना सांगितला.
“ज्या पक्षाने मला मोठं केलं, त्यात काही नाराजी असेल, तर बोलण्यासाठी जागा असते. मी परवा हेही बोललो की माझ्या कार्यकर्त्यांना सन्मान मिळत नाही. ज्या गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, त्यासाठी जागा खूप आहेत, याची मला जाणीव आहे”, असा खुलासा गोपाळ शेट्टींनी केला.
ADVERTISEMENT