सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून एन्काऊंटर करत होते? -राणे

मुंबई तक

• 09:57 AM • 29 Mar 2021

सचिन वाझे हे नेमकं कुणाच्या सांगण्यावरून एन्काऊंटर करत होते? त्यांना देण्यात आलेले १०० कोटींच्या वसुलीचे आदेश, त्यांची मनमानी. ते काय करत आहेत याची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नव्हती का? असे प्रश्न विचारून भाजप खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. एका API वर एवढी मेहरबानी कशासाठी? असाही प्रश्न नारायण राणे यांनी विचारला […]

Mumbaitak
follow google news

सचिन वाझे हे नेमकं कुणाच्या सांगण्यावरून एन्काऊंटर करत होते? त्यांना देण्यात आलेले १०० कोटींच्या वसुलीचे आदेश, त्यांची मनमानी. ते काय करत आहेत याची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नव्हती का? असे प्रश्न विचारून भाजप खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. एका API वर एवढी मेहरबानी कशासाठी? असाही प्रश्न नारायण राणे यांनी विचारला आहे. सामना दैनिकात संजय राऊत यांनी पहिल्यांदाच सरकारच्या चुका लक्षात आणून दिल्या आहेत. ज्या प्रकारे सचिन वाझेंना वाढवलं, परत पोलीस खात्यात घेतलं त्यामुळे कसे निर्णय चुकले ते या लेखात स्पष्ट केलंय. हा लेख म्हणजे लेकी बोले सुने लागे असाच आहे असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

सचिन वाझे ते परमबीर सिंग प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांत का?

संजय राऊत यांनी जो लेख लिहिला आहे त्यामध्ये त्यांनी सरकार म्हणून टीका केली असली तरीही त्यांचा अंगुलीनिर्देश हा थेट उद्धव ठाकरेंकडेच आहे असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या चुका नाव न घेता सरकारच्या चुका आहेत असं म्हटलं आहे. सरकारने ज्या गोष्टी वेळीच करायला हव्या होत्या त्या न केल्याने हे सगळं घडलं. परमबीर सिंग यांना काही गोष्टी माहित होत्या. अनिल देशमुखांनी वाझेंना दिलेलं टार्गेट माहित नव्हतं का? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या सगळ्या गोष्टी माहित असून ते गप्प का राहिले? सचिन वाझेंनी मनसुख हिरेन यांची हत्या केली तरीही त्यांना अटक करू देत नव्हते एवढं त्यांच्याबद्दल प्रेम का? सचिन वाझेंचा इतिहास मुख्यमंत्र्यांनी का तपासला नाही? सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून एन्काऊंटर करत होते? मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून? अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून की बाहेरचं कुणी त्यामागे होतं? सरकारला हे माहित नाही का? असेही प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केले आहेत.

आणखी काय म्हणाले नारायण राणे?

उद्धव ठाकरे यांचं सरकार पूर्णतः अपयशी ठरलं आहे. अनेक विषयांचं अज्ञान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना असल्याने त्यांना निर्णयच घेता आले नाहीत. निर्णयांसाठी ते इतर लोकांवर अवलंबून राहिले त्यामुळेच आता महाराष्ट्राची बदनामी झाली असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे. आज महाराष्ट्रात भयंकर परिस्थिती आहे ती कायदा आणि सुव्यस्थेची. कायदा सुव्यवस्था विकत मिळतो आहे या राज्यात. आज घडीला महिलांना मारून टाकायचं आणि सांगायचं आत्महत्या केली ही या सरकारची स्पेशालिटी आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

कोरोना हाताळण्यात ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी

राज्यातील कोरोनाचा प्रश्न हाताळण्यात ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे अशीही टीका नारायण राणेंनी केली. महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. तसंच ५२ हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात हे सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरलं आहे अशीही टीका नारायण राणे यांनी केली. कोरोना महाराष्ट्रात आणि मुंबईत वाढतो आहे. मुंबईत नाईट कर्फ्यू सुरू आहे बाकी कुठेही नाही. नाईटबार आणि पब याने काही लोकांची पोटं भरणार आहेत का? लोकांचे पगार कसे निघणार? जनतेच्या एकाही प्रश्नाकडे हे सरकार लक्ष देत नाही. सचिन वाझेंना वाचवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत असाही आरोप नारायण राणे यांनी केला.

    follow whatsapp