नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आगामी काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमधील प्रभारींच्या नावांची घोषणा केली. यात भाजपचे महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे, प्रकाश जावडेकर, विजया राहटकर यांच्याकडे महत्वाच्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पंकजा मुंडे यांच्याकडील जबाबदारी कायम ठेवण्यात आली.
ADVERTISEMENT
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची बिहारचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी साथ सोडल्यानंतर बिहार भाजपच्या हातून नुकतेच निसटले आहे. त्यामुळे आगामी काळात बिहार पुन्हा मिळविण्याची मुख्य जबाबदारी तावडे यांच्याकडे असणार आहे. तावडे यांच्याकडे यापूर्वी हरयाणा आणि चंदीगढचे प्रभारीपद होते. दरम्यान, हरयाणाच्या प्रभारीपदी आता त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लवकुमार देव यांची वर्णी लागली आहे.
याशिवाय माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केरळची जबाबदारी देण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून भाजप केरळमध्ये फक्त शिरकाव करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र डाव्यांचे वर्चस्व मोडून काढण्यात अद्याप भाजपला यश आलेले नाही. ती जबाबदारी आता राज्यसभेचे खासदार असलेल्या जावडेकर यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.
याशिवाय भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे मध्यप्रदेशचे सहप्रभारीपद कायम ठेवण्यात आले आहे. सोबतच राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांची राजस्थानच्या सहप्रभारी वर्णी लागली आहे. राजस्थान, मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये आगामी वर्षांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीने या नियुक्यांना महत्व प्राप्त झाले आहे.
आणखी कोणाकडे कोणती जबाबदारी?
भाजपचे ज्येष्ठ नेते ओम माथूर यांची छत्तीसगड प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडे यांच्याकडे पश्चिम बंगालची जबाबदारी देण्यात आली आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांना पंजाब आणि चंदीगडचे प्रभारी बनवण्यात आले आहे. खासदार विनाडे सोनकर यांना दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांचे प्रभारी करण्यात आले आहे.
खासदार राधामोहन अग्रवाल यांची लक्षद्वीपचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तरूण चुघ यांना तेलंगणाचे प्रभारी बनवण्यात आले आहे. खासदार अरुण सिंह यांना राजस्थानचे प्रभारी बनवण्यात आले आहे. खासदार महेश शर्मा यांना त्रिपुराचे प्रभारी बनवण्यात आले आहे. ईशान्य प्रदेशात संबित पात्रा यांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ऋतुराज सिन्हा सह-संयोजक म्हणून काम पाहणार आहे.
ADVERTISEMENT