भोंग्याचा मुद्दा पुढे करून काही जणांकडून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकारामुळे राज्याची बदनामी तर होत आहेच पण गुंतवणुकीवरही याचा परिणाम होऊन रोजगार निर्मितीला खिळ बसण्याचा धोका आहे. घटनेने सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यात जर कोणी अडथळे आणत असतील त्यांच्यावर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी व महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी चालवलेला हा तमाशा बंद करावा, अशा कठोर शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील भोंग्यावरुन सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
राज्यात धर्मिक अस्थिरता निर्माण करून राज्याच्या विकासाला खिळ घालण्याचे काम केले जात आहे. राज ठाकरे यांनी तरुणांची माथी भडकवण्यापेक्षा त्यांच्या हाताला रोजगार देण्याचा विचार करावा. राज ठाकरे यांना पुढे करून भाजपा केंद्रातील मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी वापर करत आहे. केंद्रातील सरकारला राज ठाकरे यांनी जाब विचारला पाहिजे परंतु दुर्दैवाने त्यांच्या भाषणात सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर एकही शब्द नव्हता. भारतीय जनता पक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्याचा वापर करुन घेत आहे, असं नाना पटोले म्हणाले.
Raj Thackeray Sabha: राज ठाकरेंच्या बोलण्याला लोकं किंमत देत नाहीत -जयंत पाटील
यावेळी नाना पटोलेंनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही आपल्या टीकेचं लक्ष्य केलं. “अडीच वर्षापूर्वी सत्ता गेल्यापासून राज्यातील भाजपच्या नेत्यांना झोप येत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी बुस्टर सभेच्या नावाखाली घेतलेल्या सभेतील त्यांचे भाषण हे केवळ सत्तेवाचून त्यांची होत असलेली तडफड दाखवणारी होती. अयोध्यातील बाबरी मशिद आम्हीच पाडली अशा फुशारक्या ते आता मारत आहेत. अयोध्येतील मशिद भाजपाने पाडली असे त्यांचे म्हणणे खरे धरले तरी त्यात आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही. मुळात भारतीय जनता पक्ष हा विध्वंस करणारा, आहे ते पाडणारा, तोडणारा पक्ष आहे. त्यांच्या हातून चांगले काही निर्माण होऊच शकत नाही, काँग्रेस पक्ष मात्र नेहमीच जोडणारा, नवे निर्माण करणारा पक्ष आहे, काँग्रेस तोडफोडीच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही”, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.
ADVERTISEMENT