BMC Ward Reservation : यशवंत जाधवांसह ‘या’ दिग्गजांना शोधावा लागणार नवा वार्ड

मुंबई तक

• 08:23 AM • 29 Jul 2022

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एससी, एसटी प्रवर्गाचे आरक्षण वगळता २१९ प्रभागांसाठी आरक्षण सोडत आज जाहीर आली. सर्वोच्च न्यायालयाने बाठिया आयोगाच्या शिफारशींप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षण देण्यास परवानगी दिल्यानंतर ओबीसी आरक्षण लॉटरी काढण्यात आली. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट होता. मात्र, राज्य सरकारने बाठिया आयोगाचा अहवालानुसार न्यायालयात रिपोर्ट सादर केला. बाठिया आयोगाच्या शिफारशी मान्य करत […]

Mumbaitak
follow google news

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एससी, एसटी प्रवर्गाचे आरक्षण वगळता २१९ प्रभागांसाठी आरक्षण सोडत आज जाहीर आली. सर्वोच्च न्यायालयाने बाठिया आयोगाच्या शिफारशींप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षण देण्यास परवानगी दिल्यानंतर ओबीसी आरक्षण लॉटरी काढण्यात आली.

हे वाचलं का?

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट होता. मात्र, राज्य सरकारने बाठिया आयोगाचा अहवालानुसार न्यायालयात रिपोर्ट सादर केला. बाठिया आयोगाच्या शिफारशी मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने त्याप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका ओबीसी आरक्षणासह घेण्यास परवानगी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एससी आणि एसटी प्रवर्गाचे आरक्षण वगळून, तसेच यापूर्वी जाहीर करण्यात आलेलं सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण रद्द करुन, आज नव्याने ओबीसी आणि महिला सर्वसाधारण वर्गांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.

बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज (२९ जुलै) एससी, एसटी प्रवर्गांचं यापूर्वी घोषित झालेलं आरक्षण वगळून २३६ पैकी २१९ प्रभागांची आरक्षण सोडत काढण्यात आली. २१९ पैकी ६३ प्रभाग हे ओबीसी प्रवर्गासाठी सुटले आहेत.

मुंबई महापालिकेच्या मागील तीन निवडणुकीमध्ये ६३ पैकी ५३ प्रभाग एकदाही ओबीसी प्रवर्गासाठी राखीव सुटलेले नाहीत. नियमानुसार ५३ वॉर्ड ओबीसींसाठी आरक्षितच होतील, तसेच तर सर्वसाधारण १५७ प्रभागांपैकी ७७ प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.

BMC Election साठी ओबीसी प्रवर्गाला सुटलेले ५३ वार्ड कोणते?

वार्ड क्रमांक ३, ७, ९, १२, १३, २७, ३०, ३८, ४०, ४२, ४८, ५१, ५३, ६२, ७६, ७९, ८१, ८७, ८९, १०१, ११०, ११७, १२८, १२९, १३२, १३५, १३७, १४६, १४७, १४८, १५०, १५२, १५४, १५५, १५९, १६१, १६४, १७४, १७९, १८०, १८३, १८५, १८८, १९५, २००, २०२, २०३, २१७, २१८, २२२, २२३, २३०, २३६ (या वॉर्डांमध्ये मागील तीन निवडणुकांत ओबीसी आरक्षण नव्हतं)

ओबीसी आरक्षणासाठी अन्य 10 वॉर्डांसाठी काढण्यात आलेली लॉटरी

वॉर्ड क्रमांक : १७, ८२, ९६, ७३, १६, १२७, ९८, ६१, १७३, १३०

राखी जाधव यांना शोधावा लागणार नवा वॉर्ड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिकेतील माजी गटनेत्या राखी जाधव यांचा वॉर्ड १३० ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. आधी हा वॉर्ड खुल्या प्रवर्गासाठी होता. त्यामुळे आता महापालिका निवडणूक लढवायची असल्यास राखी जाधवांना नवा वॉर्ड शोधावा लागणार आहे.

तृष्णा विश्वासरावांनाचा वॉर्ड ओबीसी प्रवर्गासाठी राखीव

बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीमुळे शिवसेनेच्या माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनाही फटका बसला आहे. तृष्णा विश्वासराव यांचा १८५ वा वॉर्ड ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे.

यशवंत जाधव यांनाही आरक्षण सोडतीत धक्का

अलिकडचे शिंदे गटात गेलेले मुंबई महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनाही आरक्षण सोडतीत धक्का बसला असून, यशवंत जाधव यांचा वॉर्ड क्रमांक २१७ ओबीसी महिला प्रवर्गाला सुटला आहे.

शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा वॉर्ड क्रमांक ९६ ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पत्नी व माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर या वॉर्डमधून निवडणूक लढवू शकतात.

भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे याचा वॉर्ड क्रमांक १०९ हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे, तर प्रभाकर शिंदे यांनाही त्यांचा वॉर्ड सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सुटल्याने दुसरा वॉर्ड शोधावा लागणार आहे.

    follow whatsapp