आदित्य ठाकरेंचा ‘बीएमसी’तील ड्रीम प्रोजेक्ट वादात?; आशिष शेलारांनी केले गंभीर आरोप

मुंबई तक

• 05:39 AM • 24 Aug 2022

युवा सेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई महापालिकेच्या शाळांमधील व्हर्च्युअल क्लासरुम प्रकरणात आता गंभीर आरोप झाले आहेत. आमदार आशिष शेलार यांनी व्हर्च्युअल क्लासरुमसाठीच्या निविदेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. भाजपने मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला असून, आता आशिष शेलार यांनी थेट महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल […]

Mumbaitak
follow google news

युवा सेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई महापालिकेच्या शाळांमधील व्हर्च्युअल क्लासरुम प्रकरणात आता गंभीर आरोप झाले आहेत. आमदार आशिष शेलार यांनी व्हर्च्युअल क्लासरुमसाठीच्या निविदेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.

हे वाचलं का?

भाजपने मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला असून, आता आशिष शेलार यांनी थेट महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडेच तक्रार दिलीये.

मुंबई महापालिकेच्या ४८० शाळांमध्ये सुरू असलेल्या व्हर्च्युअल क्लासरुम चालवण्याबाबतच्या निविदेमध्ये पादर्शकता दिसून येत नाही. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार शेलारांनी केली असून, याची चौकशी करण्याची मागणी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.

आशिष शेलारांनी काय केले आहेत आरोप?

१) सदर निविदेचा अभ्यास केल्यानंतर असं निदर्शनास येतं की, या निविदेमध्ये घालण्यात आलेल्या अटी-शर्ती या एका विशिष्ट कंत्राटदाराला ही निविदा मिळावी म्हणून घालण्यात आल्या आहेत.

२) ज्या कंपनीला हे काम देण्याचं प्रस्तावित करण्यात आलं आहे, त्या कंपनीनं दिलेलं अनुभवाचं प्रमाणपत्र बोगस व खोटं असल्याचं दिसून येतं आहे. त्याची महापालिकेच्या संबंधितांनी पडताळणी न करताच सदर कंपनीला काम प्रस्तावित केल्याचं दिसून येतं आहे.

३) हे काम तांत्रिक असल्यानं कामांचं तांत्रिक गुणांकन होणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालेलं दिसून येत नाही.

४) हे काम तांत्रिक व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरसोबत जोडलेलं असल्यामुळे त्या विषयातील तज्ञ व तांत्रिक दृष्टया सक्षम असलेल्या कंपनीला हे काम मिळणं अपेक्षित होतं. मात्र ज्या कंपनीला हे काम प्रस्तावित करण्यात आलं आहे, ती कंपनी तांत्रिकदृष्टया अद्ययावत व सक्षम नाही.

५) ज्या कंपनीला हे काम प्रस्तावित करण्यात आलं आहे त्या कंपनीकडं सदर कामाचा कोणत्याही स्वरुपातील अनुभव असल्याचं दिसून येत नाही. त्यामुळे एकुणच कामाचा खेळखंडोबा झाल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावरही परिणाम होऊ शकतो.

६) सदर निविदेबाबत आयटी अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी, तांत्रिक सल्लागार आणि सदर कंपनीचे अधिकारी यांच्यात वारवांर संभाषण झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अशा प्रकारचे संवाद का झाले? त्यांच्यात झालेले हे संवाद थेट भ्रष्ट्राचाराला खतपाणी घालणारे आहेत. त्याबाबतच्या तक्रारी आपल्याला तसेच लाचलुचपत विभागाकडे ही करण्यात आल्याचं मला समजलं असून ही बाब अत्यंत गंभीर आहे.

७) तांत्रिक सल्लागारांच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार झाल्याचं दिसून येत आहे. यामध्ये शिक्षण विभागातील अधिकारी, आयटी विभागातील अधिकारी आणि सदर कंपनी यांच्यामध्ये संगनमत झाले असेही दिसतं आहे.

आदी मुद्दे उपस्थित करत “तातडीने ही निविदा प्रक्रिया रद्द करुन या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, तसेच फेर निविदा काढण्यात यावी”, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.

“हा विषय महापालिका शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांशी संबंधित असल्यानं, जर माझ्या या तक्रारीची दखल घेतली नाही, तर माझ्याकडं आलेली भ्रष्टाचाराची माहिती मला उघड करावी लागेल. त्यामुळे या विषयाची गांभिर्याने दखल घ्यावी”, असा इशारा शेलारांनी दिला आहे.

    follow whatsapp