मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये होत असलेली चिंताजनक वाढ लक्षात घेता मुंबई महापालिका प्रशासनाने वेळेतच पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत १० ते १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईतला M-West वॉर्ड हा सध्या कोरोनाच्या रुग्णांच्या हॉटस्पॉट मानला जात आहे. प्रत्येक दिवसाला या भागात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत असल्यामुळे महापालिका प्रशासनाने या भागात पुन्हा एकदा लॉकडाउन लावावं लागेल अशी भीती व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
चेंबूर व नजिकच्या भागात रुग्णसंख्येत वाढ होत असलेल्या सोसायट्या महापालिकेने पुन्हा एकदा सील करण्यास सुरुवात केली आहे. तसेच या भागातील सर्व सोसायट्यांना एक सर्क्युलर काढून पुढील काही दिवसांमध्ये कोणत्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे याची माहिती देण्यात आली आहे.
अवश्य वाचा – …म्हणून मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढतायत, महापालिकेने दिली ३ कारणं
M-West वॉर्डासाठी मुंबई महापालिकेने आखून दिलेले नियम पुढीलप्रमाणे –
१) घरकाम करणाऱ्या व्यक्ती, दुधवाले अशा लोकांचा अपवाद वगळता बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींना सोसायटीमध्ये प्रवेश द्यायचा नाही.
२) सोसायटीमध्ये येणाऱ्या लोकांचं थर्मल स्क्रिनींग व इतर गरजेचे नियम पाळले जाणं बंधनकारक आहे.
३) सोसायटीमध्ये एखादा रुग्ण आढळल्यास १४ दिवसांचं सक्तीचं होम क्वारंटाईन
४) परिवारातील इतर सदस्य या व्यक्तीच्या संपर्कात असतील तर त्यांनी तात्काळ कोरोनाची चाचणी करुन घेणं बंधनकारक आहे.
५) सोसायटीतील कोणत्याही सदस्यांमध्ये कोरोना सदृष्य लक्षण आढळली तर महापालिकेच्या जवळील आरोग्य केंद्रातून त्याची कोरोना चाचणी करुन घेणं गरजेचं आहे.
१ फेब्रुवारीपासून राज्य सरकारने ठराविक वेळेत सर्वसामान्य लोकांना लोकल प्रवासाची मूभा दिली आहे. परंतू या प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, मास्क न लावणं असे प्रकार सर्रास घडताना दिसत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता महापौर किशोरी पेडणेकर व अन्य महापालिका अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असे संकेत दिले आहेत.
ADVERTISEMENT