मुंबई पोलिसांच्या निर्मल नगर पोलिसांनी वांद्रे न्यायालय परिसरातून बनावट प्रतिज्ञापत्र जप्त केली आहेत. चार हजारांहून अधिक बनावट प्रतिज्ञापत्र जप्त करण्यात आल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गटावर यावरून गंभीर आरोप केला आहे. महत्त्वाचं म्हणजे मातोश्रीचा उल्लेख करत शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी ठाकरेंवरच टीका केलीये.
ADVERTISEMENT
संजय कदम या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या निर्मल नगर पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणात बनावट प्रतिज्ञापत्र जप्त केली. पोलिसांनी ही कारवाई केल्यानंतर शिंदे गटाने यामागे ठाकरे गट असल्याचा आरोप केलाय.
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ट्विट करत, तसेच व्हिडीओतून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केलीये. ‘शिल्लक सेना शिल्लक ठेवण्यासाठी ही पातळी गाठता? निवडणूक आयोगाकडे बनावट प्रतिज्ञापत्र सादर करता? अरे, बाळासाहेबांच्या प्रतिमेची तरी लाज बाळगा रे’, असं ट्विट करत नरेश म्हस्केंनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केलाय.
shiv sena symbol freeze : निवडणूक आयोग आमचा बाप नाहीये, तो केंद्राचा वेठबिगार; अरविंद सावंत भडकले
बनावट प्रतिज्ञापत्र आढळून आल्यानंतर नरेश म्हस्के काय म्हणाले?
‘मुंबई पोलिसांच्या निर्मल नगर पोलीस स्टेशननं खोटी शपथपत्रं पकडलेली आहेत. ४ हजार ६८२ खोटी शपथपत्रे पकडेली आहेत. रबर स्टॅम्प खोटे बनवलेले आहेत. नोटरी खोट्या केल्या आहेत. ही एवढी वेळ या शिल्लक सेनेवरती का आलीये याचा सुद्धा विचार करायला पाहिजे’, असं म्हस्केंनी म्हटलंय.
‘निवडणूक आयोगाकडे शिवसैनिकांची शपथपत्र देण्याकरिता ही खोटी आणि बनावट शपथपत्रं बनवण्यात आलीये, असा माझा आरोप आहे. मला या सर्व गोष्टींची कीव वाटते की ज्या मेहनतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ही शिवसेना उभी केली. शेकडो, हजारो शिवसैनिकांच्या घामातून आणि रक्तातून ही शिवसेना उभी केली. परंतु सत्तेच्या खुर्ची करता शिवसेनेची पत ह्यांनी घालवली आहे’, अशी टीका नरेश म्हस्केंनी ठाकरेंवर केलीये.
Shivsena : ठाकरे-शिंदे वादात धनुष्य-बाण चिन्ह गोठवलं; ‘शिवसेना’ नावही वापरता येणार नाही
मातोश्रीचा उल्लेख करत नरेश म्हस्केंनी काय केलाय आरोप?
‘यांच्यावर इतकी वाईट वेळ आलीये की निवडणूक आयोगाकडे जी शपथपत्र द्यायची आहेत, त्याकरता खोटी आणि बनावट शपथपत्र बनवावी लागलीये. निवडणूक आयोगाकडे जी शपथपत्रं दिलीत, त्यांची चौकशी करायला हवी. गेला महिनाभर हा प्रकार चालू होता. हे सर्व मातोश्रीच्या मार्गदर्शनाखाली सुरूये. त्याची चौकशी झाली पाहिजे,” असा आरोप नरेश म्हस्केंनी केलाय.
ADVERTISEMENT