प्रियकराने आपल्या प्रेयसीला संपविण्यासाठी तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार प्रियकराच्याच जीवावर बेतला आहे. मुंबईच्या जोगेश्वरीमधील मेघवाडीमध्ये ही अत्यंत भीषण घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेयसीला जाळण्यासाठी गेलेल्या प्रियकरालाच आपला जीव गमवावा लागला आहे. तर प्रेयसी देखील 90 टक्क्यांहून अधिक भाजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अशी माहिती दिली की, महिलेचा प्रियकर विजय खांबे हा देखील गंभीररित्या भाजल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरीकडे विजयच्या प्रेयसीला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितलं की, ‘तरुणीच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर आम्ही मृत विजयविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणी अधिक तपास देखील सुरु करण्यात आला आहे.’
नेमकं प्रकरण काय?
विजय आणि 30 वर्षीय महिला ही गेल्या अडीच वर्षापासून एकमेकांना ओळखत होते. याच दरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध देखील निर्माण झाले होते. त्यामुळे विजयला तिच्या लग्न करायचं होतं. मात्र, महिलेच्या कुटुंबीयांचा त्यांचा लग्नाला विरोध होता. जेव्हापासून विजयला ही गोष्ट समजली तेव्हापासून त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तसंच त्याने प्रचंड दारु देखील पिण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे महिलेने त्याच्यापासून दूर राहण्यास सुरुवात केली.
दरम्यान, ६ फेब्रुवारीला महिला आपल्या घरात एकटीच होती. ही गोष्ट विजयला देखील माहित होती. या संधीचा फायदा घेऊन विजय तिच्या घरी गेला. यावेळी तिला संपवायचं या हेतूनेच तो तिच्या घरी गेला होता. त्यामुळे तिच्या घरी जाताना तो पेट्रोलने भरलेली बाटली सोबत घेऊन गेला होता. घरी पोहचताच विजयने पेट्रोल तिच्यावर ओतलं आणि आपल्या जवळील लायटरने तिला पेटवून दिलं. अचानक पेट घेतल्यानंतर महिलेने थेट विजयच्या दिशेने धाव घेतली आणि त्याला घट्ट मिठी मारली. ज्यामुळे विजय देखील पूर्णपणे भाजला.
जळालेल्याच अवस्थेत दोघंही घराबाहेर आले. त्यावेळी शेजाऱ्यांनी आग विझवून दोघांनाही ट्रॉमा रुग्णालयात नेलं. तिथून त्यांना जेजे रुग्णालयात पाठविण्यात आलं. पण उपचारादरम्यान विजयचा मृत्यू झाला. तर ९० टक्क्यांहून अधिक भाजलेली महिला देखील मृत्यूशी झुंज देत आहे.
या संपूर्ण प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT