– ज़का खान, बुलढाणा प्रतिनिधी
ADVERTISEMENT
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील डॉक्टर सचिन सांगळे यांनी एका पाच वर्षाच्या मुलीच्या गळ्यात अडकलेलं पाच रुपयाचं नाण कोणतीही शस्त्रक्रीया न करता किंवा मुलीला बेशुद्ध न करता बाहेर काढून दाखवलं आहे. या घटनेमुळे शेगावमध्ये सर्वत्र डॉ. सांगळे यांनी दाखवलेल्या धैर्याचं आणि समयसुचकतेचं कौतुक होताना दिसत आहे.
पाच वर्षीय मुलगी संगीता जयसिंग ही जामोद तालुक्यातील बिंगारा गावात राहते. खेळत असताना संगीताने नकळत पाच रुपयांचं नाणं गिळलं. हे नाणं संगीताच्या अन्ननलिकेत अडकलं, ज्यामुळे तिला जेवताना त्रास व्हायला लागला. यानंतर संगीताच्या घरच्यांनी तिला जामोदमधील बालरोग तज्ज्ञ डॉ. संदीप वाकेकर यांच्या रुग्णालयात आणलं.
डॉक्टरांनी संगीताचा एक्स-रे काढल्यानंतर तिच्या गळ्यात नाणं अडकल्याचं दिसून आलं. डॉ. वाकेकर यांनी गळ्यातलं नाणं बाहेर काढण्यासाठी संगीताच्या पालकांना शेगावमधील डॉ. सचिन सांगळे यांच्याकडे उपचारासाठी जायला सांगितलं. डॉ. सांगळे यांनी यावेळी समयसूचकता दाखवत मुलीवर कोणतीही शस्त्रक्रीया न करता किंवा तिला बेशुद्ध न करता फोजिल कॅथेटर या उपकरणाच्या सहाय्याने हे नाणं बाहेर काढलं.
डॉ. सांगळे यांनी याआधीही अशाच पद्धतीने एका मुलाच्या गळ्यात अडकलेला बॅटरीचा सेल बाहेर काढला होता. त्यांच्या या कामाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे.
ADVERTISEMENT