निलेश पाटील, नवी मुंबई
ADVERTISEMENT
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale) यांच्या विरोधात खुद्द त्यांच्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचार आणि अनैतिक संबंध असल्याचं म्हणत पोलिसात तक्रार दिली आहे. नवी मुंबईच्या नेरुळ पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आल्याने मनसेमध्ये देखील खळबळ माजली आहे.
अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गजानन काळेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
गजानन काळे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले असून त्यानंतर गजानन काळे यांनी पत्नी व मुलाला सोडून आपले बिऱ्हाड भाड्याच्या घरात थाटले. अनेक दिवस गजानन काळे घरी परतला नाही म्हणून त्यांच्या पत्नीने चौकशी केल्यावर तो सीवूड परिसरात अन्य ठिकाणी भाड्याच्या घरात वास्तव्याला असून त्यांचे विवाहबाह्य सबंध असल्याचे पत्नीला समजले. त्यामुळेच त्याने आपले घर सोडलं असल्याचं गजानन काळे यांच्या पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
‘मी अनुसूचित जातीची असल्याने तिला जातीवाचक शिवीगाळ केली जात होती. एवढंच नव्हे तर मी खालच्या जातीची असल्याचं सांगून मला सासूचे अंतिम दर्शन देखील घेऊ दिले नाही.’ असा गंभीर आरोपही गजानन काळे यांच्या पत्नीने केला आहे.
गजानन काळे हे मनसेचे दहा वर्षापासून नवी मुंबई शहराध्यक्ष असून त्यांनी दोन वेळा बेलापूर विधानसभा निवडणूक देखील लढविली आहे. त्यामुले मनसेच्या जवळपास सर्वच वरिष्ठ नेत्यांच्या ते निकटचे मानले जातात.
गजानन काळे यांच्या पत्नी नवी मुंबई येथील नेरुळ येथे वास्तव्यास आहेत. त्यांना 10 वर्षांचा मुलगाही आहे. गजानन काळे यांचे सासरे हे सहसचिव गृह व वित्त विभाग महाराष्ट्र शासन या पदावरून निवृत्त झाले आहेत.
गजानन काळे यांची त्यांच्या पत्नीशी कॉलेजमध्ये या शिकत असताना ओळख झाली होती. पुढे दोघांनी विवाह केला. विवाहानंतर सुरुवातीचा काळ हा व्यवस्थित गेला मात्र पुढे दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. मात्र प्रतिष्ठित जीवन जगत असल्याने हा सारा जाच आपण सहन करत गेलो असं गजानन यांच्या पत्नीने म्हटलं आहे.
2008 साली गजानन काळे यांचा विवाह सोहळा पार पडला होता. विवाहानंतर त्यांची पत्नी ही एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करीत होती. गजानन काळे राजकारणात सक्रिय असल्याने कुठलाही कामधंदा करत नव्हते. सुमारे तीन वर्ष विवाहानंतर संसाराचा गाडा त्यांची पत्नीच ओढत होती.
गजानन काळेंच्या पत्नीने नेमकं काय आरोप केले?
‘लग्नानंतर 15 दिवसांनी गजानन काळेने किरकोळ घरगुती कारणावरून भांडण करून माझा सावळा रंग व माझी जात यावरुन मला टोमणे मारू लागला. जातीवाचक शिवीगाळ करू लागला. तू सावळी आहेस, तुझी जात वेगळी आहे तरी देखील मी तुझ्याशी लग्न केले आहे. माझी चूक झाली. तुझ्या वडिलांची पोस्ट बघून मी तुझ्याशी लग्न केले. परंतु त्याचा मला काहीएक फायदा झाला नाही.’
‘यावरुन तेव्हा आमच्या दोघांमध्ये भांडण झालं. त्यावेळी गजानने मला मारहाण केली होती. तेव्हा मी माझ्या आई-वडिलांना फोन केला असता ते माझ्या घरी आले. या वादानंतर मी माहेरी निघून जाणे पसंत केले. मात्र काही दिवसांनी समजूत काढून पुन्हा वाद होणार नाही असे पटवून त्याने पुन्हा मला घरी आणले.’
‘मात्र पुन्हा वाद होऊ लागल्याने शारीरिक व मानसिक त्रास झाल्याने दादर येथे मी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करत घेत होते. वर्षभर हे उपचार सुरू होते.’
दरम्यान, ‘गजानन याचे इतर स्त्रियांसोबत अनैतिक संबंध असल्याची खात्री फोनवरील संभाषणवरून झाली होती. पण दुसरीकडे समाजात त्याची प्रतिमा चांगली राहावी व लोकांना वाटावे कुटुंबवत्सल आहे हे भासवण्यासाठी कौटुंबिक कार्यक्रम, लग्नाचा वाढदिवस, मुलाचा वाढदिवस अशा कार्यक्रमांचे फोटो मला जबरदस्ती सोशल मीडियावर पोस्ट कराव्या लागत होत्या.’
‘एवढंच नाही तर गजानन काळे म्हणतो की, त्याच्या सात पिढ्या बसून खातील एवढा पैसा त्याच्याकडे आहे. मात्र, असं असताना देखील तो मागील दोन महिन्यापासून घरखर्च देत नव्हता. अशावेळी मी माझ्या मुलाचा सांभाळ कसा करावा? त्यामुळे आज मी नाईलाजास्तव गजानन विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.’ अशी माहिती गजानन यांच्या पत्नीने पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
Pune: ‘बहिणीच्या लग्नाला जाऊ का?,’ विचारताच डॉक्टर पतीने डॉक्टर पत्नीचे केसच कापले!
दरम्यान, मनसे नेत्याच्या पत्नीनेच एवढे मोठे आरोप केल्यानंतर आता पक्षाकडून त्याच्यावर कोणती कारवाई करण्यात येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT