प्रयागराज या ठिकाणी झालेल्या महंत नरेंद्र गिरी गूढ मृत्यू प्रकरणाची चौकशी आता सीबीआयकडून केली जाते आहे. या प्रकरणी सीबीआयने आरोप पत्र दाखल केलं आहे. यामध्ये त्यांनी नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी याच्यासहीत तिघांना आरोपी ठरवलं आहे. कोर्टाने सीबीआयद्वारे जी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे त्याची दखल घेऊन या प्रकरणी 25 नोव्हेंबरला सुनावणी घेण्याचं ठरवलं आहे.
ADVERTISEMENT
या प्रकरणी कोर्टाने तिन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडी पुढच्या सुनावणीपर्यंत म्हणजेच 25 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. या प्रकरणी कोर्टाने व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्य आरोपी आनंद गिरीसोबत चर्चा केली आणि त्याची बाजू काय आहे ते समजून घेतलं. महंत नरेंद्र गिरी यांच्या गूढ मृत्यू प्रकरणी तिन्ही आरोपींना 22 सप्टेंबरपासून नैनी येथील मध्यवर्ती कारागृहात बंद करण्यात आलं आहे. महंत नरेंद्र गिरी यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप या तिघांवरही आहे.
20 सप्टेंबर 2021 ला महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह बाघम्बरी मठातील त्यांच्या कक्षात आढळून आला होता. या प्रकरणी सीबीआयने आनंद गिरी, आद्या प्रसाद तिवारी आणि संदीप तिवारी यांची सखोल चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवले होते. सीबीआयने आपल्या चार्जशीटमध्ये या तिघांना आरोपी ठरवलं आहे. हरिद्वार या ठिकाणी आनंद गिरी यांच्या नव्या आश्रमात जाऊनही सीबीआयने चौकशी केली. तसंच त्याचा मोबाईल आणि लॅपटॉपही जप्त करण्यात आला आहे.
Narendra Giri मृत्यू प्रकरणात अटकेत असलेले आनंद गिरी आधीपासूनच वादग्रस्त
काय आहे प्रकरण?
अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांचा मृतदेह प्रयागराज येथील बाघंबरी मठातील खोलीत त्यांचा मृतदेह दोरीला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. मात्र, या घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांना एक सात पानाची सुसाईड नोट मिळाली होती. ज्यात काही जणांकडून त्रास होत असल्याचा उल्लेख आहे. महंत नरेंद्र गिरी यांच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या या सुसाईड नोटमध्ये अनेक लोकांची नावं आहेत. या लोकांकडून त्यांना त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यात त्यांचा शिष्य आनंद गिरी यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आलेला आहे.
अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी आणि त्यांचा शिष्य आनंद गिरी यांच्या बऱ्याच काळापासून वाद सुरू होते. नंतर दोघांमध्ये समेट झाला. तेव्हा हरिद्वारवरून प्रयागराजला येऊन आनंद गिरीने नरेंद्र गिरी यांच्या पायावर डोकं माफी मागितली होती.
अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू, काय आहे सुसाईड नोटमध्ये?
काय म्हटलं आहे कथित सुसाईड नोटमध्ये?
‘मी महंत नरेंद्र गिरी खरं तर मला 13 सप्टेंबर 2021 लाच आत्महत्या करायची होती. मात्र माझी हिंमत झाली नाही. आज मला हरिद्वारमधून असं समजलं आहे की आनंद गिरी कॉम्प्युटर किंवा मोबाईलचा वापर करून एखाद्या महिलेसोबत किंवा मुलीसोबत माझे फोटो व्हायरल करू शकतो. मी त्या महिलेसोबत किंवा मुलीसोबत कसं गैरवर्तन करतो आहे ते तो फोटो व्हायरल करून सांगू शकतो. त्यामुळे मला याबाबत आधीच सफाई देणं आवश्यक वाटतं आहे. मी ज्या पदावर आहे ते एक सर्वोच्च सन्मान असलेलं पद आहे. सत्य काय आहे ते लोकांना नंतर कळेलच. मात्र बदनामीच्या भीतीने मी आता माझं आयुष्य संपवतो आहे. माझ्या या निर्णयाची जबाबदारी आनंद गिरी, आद्या प्रसाद तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप तिवारी यांची असणार आहे’
आनंद गिरी आणि वाद
नरेंद्र गिरी यांचे मुख्य शिष्य असलेले आनंद गिरी हे कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आनंद गिरी यांना ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये छेडछाड प्रकरणात तुरुंगातही जावं लागलं होतं. जेलमधून सुटल्यार जमिनीच्या वादातही त्यांचं नाव समोर आलं होतं. त्यांच्यावर हे आरोप झाल्यानंतर नरेंद्र गिरी यांनी आनंद गिरी यांच्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर आनंद गिरी यांनी नरेंद्र गिरी यांच्यावर मठाची जमीन विकल्याचा आरोप केला होता. त्यामुळे या दोघांमधला वाद वाढत गेला. यानंतर आनंद गिरी यांनी एक व्हीडिओ पोस्ट करून सगळ्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मठात जाऊन पाय धरून नरेंद्र गिरी यांची माफीही मागितली होती. नरेंद्र गिरी यांनी आपल्या शिष्याला माफ केलं पण त्यांना आखाड्यात सहभागी करून घेतलं नाही.
ADVERTISEMENT