केंद्रीय तपास यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याची टीका आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर ईडी आणि सीबीआयची कारवाई सुरु आहे. याविषयी प्रश्न विचारला असता राज ठाकरेंनी तपास यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर होत असल्याचं सांगितलं.
ADVERTISEMENT
“केंद्रीय तपास यंत्रणांचा नक्कीच गैरवापर होतोय. काँग्रेसच्या काळातही तो झाला आणि भाजपच्या काळातही तो होतोच आहे. तपास यंत्रणा या तुमच्या हातात बाहुल्या नाहीयेत, तुम्हाला नको असलेल्या माणसाला संपवण्यासाठी त्यांचा वापर नाही करता येत, हे अत्यंत चुकीचं आहे”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी आपली भावना बोलून दाखवली.
ज्यांनी खरे गुन्हे केलेत तो मोकाट सुटलेत आणि तुम्ही तुम्हाला नको असलेल्या लोकांसाठी अशा प्रकारे तपास यंत्रणाचा वापर नाही करु शकत असंही राज म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख, भाजपतून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे, अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर कारवाई केली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी मराठा-ओबीसी आरक्षण ते नवी मुंबईतील विमानतळ नामकरणाचा मुद्दा यासारख्या अनेक विषयांवर भाष्य केलं.
ADVERTISEMENT