डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आज कोर्टात पाचही आरोपींविरुद्ध आरोप निश्चीत करण्यात आले आहेत. डॉ. विरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाचही आरोपींविरुद्ध आज आरोपांची निश्चीती झाली. परंतू या पाचही आरोपींनी आपले गुन्हे कबूल केलेले नाहीयेत. अतिरीक्त सत्र न्यायाधीश एस.आर.नावंदर यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
ADVERTISEMENT
पाच आरोपींपैकी सचिन अंदुरे, विरेंद्रसिंह तावडे आणि शरद कळसकर हे आजच्या सुनावणीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे हजर होते. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांनी न्यायालयात हजेरी लावली होती. सीबीआयकडून विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी तर बचाव पक्षाकडून विरेंद्र इचलकरंजीकर यांनी कोर्टासमोर बाजू मांडली.
यावेळी करोनाचे कारण सांगून आरोपींनी वकील आणि नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी आरोप निश्चितीस मुदत देण्याची विनंती केली. मात्र त्यावर न्यायालयाने मुदतवाढ देण्यास नकार देत आरोप निश्चिती झाली असून गुन्हा कबूल आहे की नाही.अशी विचारणा आरोपींना केली. त्यावर आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे न्यायालयाला सांगितले. आता यावर 30 सप्टेंबरला सरकार वकील आणि बचाव पक्षा मार्फत पुराव्यासंबंधीची कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करणार आहेत.
दरम्यान, आरोपींवर आरोप निश्चीत झाल्यानंतर न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ झाल्याचं मत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे पुत्र हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केलं आहे. उशिरा का होईना डॉक्टरांच्या खुनातील आरोपींवर निश्चित झाले… यानंतर या सर्व प्रकरणाची ट्रायल लवकरात लवकर सुरु होऊन दाभोळकर हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधारापर्यत पोचता येईल अशी अपेक्षा आहे. गेल्या आठ वर्षातील लढाईतील सर्वात महत्वाची घडामोडी आज घडल्याचंही हमीद दाभोळकर यांनी म्हंटलय.
ADVERTISEMENT