कोल्हापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कोल्हापूरमध्ये रस्त्यात झालेली भेट ही सध्या खूपच चर्चेत आहे. खरं तर एकाच दिवशी हे दोन्ही नेते कोल्हापूरमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले आहेत. अशावेळी कोल्हापूरमधील शाहूपुरी परिसरात दोन्ही नेत्यांची रस्त्यातच भेट झाली. यावेळी रस्त्यातच थांबून आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये काही काळ चर्चा देखील झाली.
ADVERTISEMENT
दरम्यान, त्यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा देखील सुरु झाली. यावेळी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमकी काय चर्चा झाली असावी याविषयी अनेक तर्कवितर्क देखील लढवले जात आहे. अनेकांच्या मते, ही भेट योगायोगाने झालेली असावी. मात्र, असं अजिबात नाही. या दोन्ही नेत्यांची ही भेट ठरवून झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
नेमकी कशी झाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीमधील पूरग्रस्त भागाची पाहाणी करण्यासाठी जात असतान त्याच ठिकाणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस देखील पहाणी करत असल्याची माहीती मुख्यमंत्र्यांना मिळाली.
त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना निरोप दिला की देवेंद्र फडणवीस यांना मी तिथेच भेटतो. त्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना तसा निरोप देखील दिला. त्यामुळे फडणवीस जेव्हा शाहूपुरी परिसरात पोहचले त्याच्या काही मिनिटातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफा देखील पोहचला. त्यानंतर दोन्ही नेत्यांची भेट झाली.
दरम्यान, या भेटीत फक्त पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्याची पाहणी केली आणि त्यानंतर ते कोल्हापुरच्या शहरी भागात पाहणी करण्यासाठी वळाले. याचवेळी शाहपुरी भागात देवेंद्र फडणवीस हे देखील पूरग्रस्तांशी संवाद साधत होते. ही माहिती मिळताच आपण तिथेच फडणवीसांशी चर्चा करु असा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि ठरल्याप्रमाणे दोघांची भेटही झाली.
कोल्हापुरात CM Thackeray आणि Devendra Fadnavis आले समोरासमोर, रस्त्यातच थांबून केली चर्चा!
कोल्हापूर मधील शाहूपुरी हा शहरातील मध्यवर्ती भाग असून या भागात पुराचं प्रचंड पाणी शिरलं होतं. ज्याचा मोठा फटका येथील नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना बसला आहे. या संपूर्ण परिसरात साधारण 8 फूटापर्यंत पाणी होतं. तसंच आतापर्यंत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
जेव्हा देवेंद्र फडणवीस हे या भागात पोहचले तेव्हा येथील नागरिकांनी त्यांना गाराडा घालून याबाबत प्रश्न देखील विचारले. असं असताना त्याच भागात मुख्यमंत्र्यांचा देखील ताफा आला. ज्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी आपआपसात चर्चा देखील केली.
ADVERTISEMENT