मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात जाऊन पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली. भामरागड तालुक्यातील धोडराज येथील पोलीस जवानांसोबत दिवाळी कार्यक्रमात शिंदे यांनी सहभाग घेतला. मुख्यमंत्र्यांनी अतिदुर्गम आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अतिदुर्गम पोलीस ठाण्यात पोहचून दिवाळी साजरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री शिंदे यांचे मंगळवारी सकाळी विमानाने नागपुरात आगमन झाले. तिथून हेलिकॉप्टरने ते धोडराजला रवाना झाले. धोडराज येथील पोलीस ठाण्याच्या आवारातील हेलिपॅडवर वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जवानांसोबत दिवाळी साजरी करतानाच त्यांनी पोलीस जनजागरण कार्यक्रमात उपस्थिती लावली. तसंच शिंदे यांच्या हस्ते धोडराज पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचे उद्घाटन देखील करण्यात आले. यानंतर त्यांनी धोडराज येथील स्थानिकांशी देखील संवाद साधला.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, दुर्गम गडचिरोली जिल्ह्याचा विकास हे आपले प्रथम उद्दिष्ट आहे. गडचिरोलीचा पालकमंत्री होतो तेव्हापासून जिल्ह्यातील पोलिसांसोबत दिवाळी साजरी करण्याची प्रथा आहे. त्यामध्ये कुठेही फरक पडलेला नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील आज भामरागड येथे जात असल्याचा मला आनंद आहे.
दिवाळीसारख्या सणाला आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या, आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलासोबत दिवाळी साजरी करणे समाधानाची बाब आहे. आता हळूहळू गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद संपत असल्याचा आनंद आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यावर्षीची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत साजरी केली. यंदा पंतप्रधान मोदी यांनी जम्मू काश्मीरमधल्या कारगील द्रास येथे भारतीय सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. नरेंद्र मोदी यांच्या याच पावलावर पाऊल टाकतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यंदाची दिवाळी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात जाऊन पोलिसांसोबत साजरी केली.
ADVERTISEMENT