काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेतलं तर बरं होईल अशा आशयाचं एक पत्र लिहीलं. यानंतर राज्यात राजकारणात खळबळ उडून पुन्हा एकदा सेना-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलं. आजच्या रोखठोक या सदरात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याच पार्श्वभूमीवर भाजपला लक्ष्य केलंय. कधीकाळी मोदी, शाहा यांनाही केंद्रीय तपास यंत्रणांचा त्रास सहन करावा लागलाय, त्यांना या मनस्तापाची कल्पना असावी असं राऊत यांनी आपल्या सदरात म्हणलंय.
ADVERTISEMENT
ईडीचे तपास अधिकारी सरनाईकांच्या मागे हात धुवून लागले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून सरनाईक परागंदा आहे. या सर्व प्रकरणात आपल्याला व आपल्या कुटुंबाला विनाकारण त्रास सुरु असल्याचं सरनाईक यांनी म्हटलंय. ज्यावेळी त्यांना ईडीचे समन्स आले त्यावेळी शेवटपर्यंत भाजप आणि ईडीच्या अन्यायाशी लढेन असं सरनाईक म्हणाले होते. अर्णब गोस्वामीविरोधात हक्कभंग आणणारे सरनाईक आज एवढे हतबल का झाले? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
किरीट सोमय्या केंद्रीय यंत्रणांचे दलाल, नाव न घेता प्रताप सरनाईकांचा आरोप
केंद्रीय तपास यंत्रणांचा नाहक छळ राज्य सरकार थांबवू शकत नाही हे लोकशाहीचं मोठं दुर्दैव ! ईडीच्या कार्यालयात बोलावूनघ घेतलं जातं आणि मूळ विषयाचा तपास बाजूला ठेवून बाकीच्या राजकीय विषयांवर प्रश्न विचारले जातात. ज्याचा मुळ गुन्ह्याशी संबंध नाही असे सर्वकाही प्रश्न विचारले जातात. हा दबाव टाकण्याचाच प्रकार आहे. महाराष्ट्राच्या लोकप्रतिनीधींची ही कैफियत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे मांडायला हवी असंही राऊत आपल्या लेखात म्हणाले आहेत.
याचसोबत ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर केलेल्या छापेमारीवरही राऊत यांनी आपल्या लेखात भाष्य केलं आहे. देशमुख हे जणू काही चंबळ खोऱ्यातले डाकू आहेत अशा पद्धतीने ईडीने कारवाई केली आहे. महाराष्ट्राच्या स्वायत्तेवर हा आघात आहे. ईडी आणि सीबीआयची निर्मिती ही पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासाठीच झाली की काय असं वाटावं असे प्रकार दोन्ही राज्यांत घडवले जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
ADVERTISEMENT