महाराष्ट्रात वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाययोजना हाती घ्याव्या लागतील याबद्दल चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत राज्य सरकार लॉकडाउन लावण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतं असे संकेत मिळत आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे.
ADVERTISEMENT
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनप्रमाणे हे लॉकडाउन नसेल. कॅबिनेटची बैठक पार पडल्यानंतर राज्य सरकार निर्बंध जाहीर करण्याची शक्यता आहे. ज्यात प्रवासावर निर्बंध, वर्क फ्रॉम होम यासारखे निर्बंध जाहीर केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत असताना लॉकडाउन लावण्याबद्दलचा इशारा दिला होता. दोन दिवसांत तज्ज्ञांशी बोलल्यानंतर जर मला दुसरा पर्याय मिळाला नाही तर लॉकडाउन लावावं लागेल असं मुख्यमंत्री म्हणाले होते.
‘प्लेगच्या साथीत रँडने अत्याचार केले, तसाच अनुभव जनतेला येतोय’
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या कॅबिनेटची बैठक बोलावलेली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महत्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. देशातील महत्वाच्या राज्यांमध्ये वाढत असलेली रुग्णसंख्या आणि त्यावर नियंत्रण कसं मिळवायचं याबाबत या बैठकीत चर्चा सुरु असल्याची माहिती मिळते आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा कहर काही थांबताना दिसत नाहीये. कारण काल दिवसभरात राज्यात ४९ हजार ४४७ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात ३७ हजार ८२१ रूग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण २४ लाख ९५ हजार ३१५ कोरोनाबाधित रूग्ण बरे झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८४.४९ टक्के इतका झाला आहे. मार्च महिन्याच्या सुरूवातीला हा रिकव्हरी रेट ९२ टक्के आणि त्याच्याही वर होता. राज्यात २७७ कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद दिवसभरात झाली आहे. राज्याचा मृत्यू दर १.८८ टक्के इतका झाला आहे.
महाराष्ट्रात काल नोंद झालेल्या २७७ मृत्यूंपैकी १३२ मृत्यू हे मागील ४८ तासांमधील आहेत. तर ६७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ७८ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपूर्वीचे आहेत. हे ७८ मृत्यू पुणे २२, औरंगाबाद २१, नागपूर १६, ठाणे ६, यवतमाळ ५, नाशिक २, अकोला १, बुलढाणा १, हिंगोली १, लातूर १, नांदेड १ आणि सोलापूर १ असे आहेत.
नियम फक्त सामान्यांसाठी? माजी शिवसेना नगरसेवकाच्या मुलीच्या लग्नात गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा
ADVERTISEMENT