Mumbai Tak Exclusive : तांबेंनी विश्वासघात केला, धोका दिला : पटोलेंचे आरोप

मुंबई तक

20 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:15 AM)

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा आहे ती नाशिक पदवीधर मतदारसंघाची. विद्यमान आमदार सुधीर तांबे यांनी पक्षाचा एबी फॉर्म मिळूनही अर्ज दाखल केला नाही. त्यांच्या जागी त्यांचेच पुत्र सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपचा पाठिंबा घेणार असल्याचही त्यांनी सांगितलं. त्यानंतर तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करत त्यांना पक्षातून […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा आहे ती नाशिक पदवीधर मतदारसंघाची. विद्यमान आमदार सुधीर तांबे यांनी पक्षाचा एबी फॉर्म मिळूनही अर्ज दाखल केला नाही. त्यांच्या जागी त्यांचेच पुत्र सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपचा पाठिंबा घेणार असल्याचही त्यांनी सांगितलं. त्यानंतर तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबितही केलं.

हे वाचलं का?

दरम्यान, याच सर्व प्रकारावर ‘मुंबई तक’ ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसची सविस्तर आणि स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी पटोलेंनी तांबे पिता-पुत्रांवर विश्वासघात केल्याचा आणि धोका दिल्याचा आरोप केला. शिवाय या दोघांवरील कारवाईबाबतही भाष्य केलं.

काय म्हणाले नाना पटोले? वाचा सविस्तर

प्रश्न: सत्यजीत तांबेना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं. तुमची याबाबतची नेमकी बाजू काय?

नाना पटोले : महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. महाराष्ट्र हा काँग्रेस विचारांचा आहे. एक काळ होता की, महाराष्ट्रात काँग्रेसच्या नावावर कोणीही उभं केलं तरी निवडून यायचं. अशी ती परिस्थिती होती. अनेक संस्थानिक कुटुंबीय काँग्रेससोबत जोडले गेले. त्यांनाही सत्तेत सहभागी होता आलं. मोठ्या-मोठ्या पदावर ते राहिले. काही ठिकाणी अॅडजस्टमेंटचं राजकारण झालं. त्यामुळे काँग्रेसला नुकसान झालं असेल. या सगळा अंदाज आहे.

आता तुम्ही जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नावर साध्या सरळ भाषेत सांगतो की, ते सगळ्यांना कळतं की, जो मतदारसंघ आहे पदवीधर मतदारसंघ आहे. म्हणजे सुशिक्षित लोकांचा मतदार आहे. डॉ. सुधीर तांबे, त्यांच्या पत्नी तसेच सत्यजीत तांबे त्यांच्या पत्नी आणि थोरात साहेबांची मुलगी हे पाच लोकचं फॉर्म भरायला जातात. फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी अपक्ष फॉर्म भरतात. सुधीर तांबेंना तिकीट देऊन सुद्धा ते फॉर्म भरत नाही.

बाहेर आल्यावर सत्यजीत तांबे म्हणतात की, मी फडणवीस आणि बावनकुळेंकडे जाऊन त्यांची मदत घेऊ अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी करणं. खरं बाहेर सल्ला देत असेल तर त्यांनाही माझा सल्ला आहे की, दोन वेगवेगळ्या व्यक्तींचा तिकिटाचा संघर्ष असता तर ते पक्षाने दोघांना बसवून आणि समजवून सामोपचाराने पुढे जाता आलं असतं. हा एक घरातील प्रश्न होता. त्यांनी मला सांगितलं असतं की, मला आता नाही लढायचं माझ्या मुलाचं आग्रह आहे. तर मी सांगितलं असतं मुलाचं नावान फॉर्म भरा मी वरुन तुम्हाला परवानगी द्यायची जबाबदारी माझी पण फॉर्म भरून टाका.

तुमच्या माध्यमातून जे खरं आहे ते जाऊ द्या लोकांसमोर. मी साडेबारा वाजता सुधीर तांबेंशी बोललो की, कारण की, मला थोरात साहेबांना सांगितलं की, तुम्ही सुधीर तांबेंशी बोला. मी त्यांनाही बोललो की, बाळासाहेबांचंही मत आहे. तुम्ही फॉर्म भरा. नंतर आपण त्यावर बोलू. ते म्हणाले की, ठीक आहे मी फॉर्म भरायला चाललो आहे.

त्याच्या चार-पाच दिवस आधी प्रदेश काँग्रेसची मीटिंग झाली. त्यातही त्यांना मला सांगता आलं असतं पण त्या मीटिंगला देखील ते आले नाही. बाळासाहेबांना लागेलेलं असताना ते मीटिंगला आले नव्हते. सुधीर तांबेंना येता आलं असतं. पण ते मीटिंगला आले नाही. ऐनवेळवर पक्षाला आपल्या घरचा पक्ष आहे असं समजणं आणि सुधीर तांबे असतील कोणीही असेल, मी असेल. असंख्य कार्यकर्त्यांचं योगदान मला निवडून आणण्यात असतं. ते विचाराला मतदान करतात. पण त्याला गृहीत धरून चालावं आणि आम्हीच इथले मालक आहोत अशा पद्धतीची व्यवस्था व्हावी पक्षाला काहीच न समजावं असं होऊ शकत नाही.

पक्षाची काही नियमावली तयार करण्यात आल्या आहेत. आता ते लोकं पक्षात एवढी वर्ष होते. आता तांबे परिवार पक्षात नाही. पण त्या नियमावलीचा देखील त्यांना अभ्यास नसेल तर मग ही गंभीर बाब आहे.

12 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत जे घडलं शेवटच्या क्षणापर्यंत घडलं. हे पहिले समजलं असतं तर आम्ही वेगळी तयारी केली असती. सांगितलं असतं तर. पण बाहेर येऊन ज्या पद्धतीने सत्यजीत तांबेंनी जे वक्तव्य केलं की, मी कोणाचाही पाठिंबा घेऊ शकतो. याचा अर्थ तुमची भूमिका जी आहे ती स्पष्ट झाली आणि जेव्हा 2014 पासून जे मोदींचं सरकार केंद्रात आलं तेव्हापासून हे जे संस्थानिक राजकारण्यांची परिस्थिती आपण पाहिली त्यामध्ये कोट केलं पाहिजे आता हर्षवर्धन पाटील यांनी एका जाहीर सभेत सांगावं की, ‘बरं झालं मी भाजपमध्ये आलो नाही तर मी पण जेलमध्ये असतो.’

आम्ही संस्थानिकांनाही वाढवलं असेल तर आम्ही गरीबांना देखील मोठं केलं. काही लोकांची परिस्थिती नव्हती तरी ते लोकं सत्तेत आले आणि ते काय आहेत ते आपणं पाहतोय. सिंधियांपासून अनेक लोकं आहेत देशभरात अशी.

काँग्रेसने सर्व लोकांनाच सोबत घेऊन चालायची भूमिक मांडली. त्यात काँग्रेसचं चुकलं असं म्हणता येणार नाही. कोणाच्या मनात चुकीचं असेल. ते सांगत असतील आम्ही काँग्रेसचे आहोत पण त्यांच्या मनात काही वेगळं असेल तर आम्ही काय भविष्य सांगणारे पक्ष नाहीत.

भविष्य सांगणारा पक्ष तर आता सत्तेत आहे. म्हणून आमची भूमिका स्पष्टपणे अशी आहे की, जे काही झालं त्याने पक्षाची मानहानी झाली. सुधीर तांबेंनी आम्हाला पहिले सांगितलं असतं, विश्वासात घेतलं असतं. तर आम्ही सत्यजीत तांबेंनाही सांगितलं असतं.

तिकीटाची प्रक्रिया ही काही एका दिवसात होत नाही. आमची बैठक झाली. त्यात सुशीलकुमार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि मी होतो. हे सगळे लोकं होते. आमची यावर चर्चा झाली की, सुधीर तांबेंचं नाव निश्चित झालं तेव्हा ते तिथे हजर होतेच. त्यावेळेसही बाळासाहेबांना भूमिका मारता आली असती की, नाही सुधीर तांबेंना तिकीट देऊ नका. अमुकाला द्या.. असं म्हणता आलं असतं. पण ते म्हणाले सुधीर तांबे विद्यमान आमदार आहेत. तर झालं.

प्रश्न: बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं असतं की, सत्यजीत तांबेंना तिकीट द्या तर तुम्हाल काही आक्षेप नव्हता?

नाना पटोले : ते तसं म्हणाले असते तर आम्हाला काय अडचण होती.

प्रश्न: सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबेंनी असं ठरवलं होतं की, भाजपचा उमेदवार कोण आहे हे पाहून आपण निर्णय घ्यायचा की, कोण निवडणूक लढणार. असं सूत्रांकडून समजतं आहे.

नाना पटोले : तुम्हीच प्रश्नाचं उत्तर दिलं आहे की, भाजपचा उमेदवार कोण आहे हे पाहून आपण ठरवू की, कोण निवडणूक लढवायची. म्हणजे हे लोकं आपल्या घरातील पक्ष समजत आहेत ना. हे युद्ध आहे. आम्ही विचाराची लढाई लढतोय.

मला स्वत: माझं तर नागपूर हे काही कार्यक्षेत्र नव्हतं. भंडारा-गोंदिया हे कार्यक्षेत्र होतं. मला जेव्हा राहुलजींना 15 दिवसांपूर्वी सांगितलं की, तुम्हाला नागपूर लढायचंय.. तेव्हा मी काही नाही म्हटलं नाही.. मला पक्षाचा आदेश आला.. आदेशाचं पालन करणं ही माझी जबाबदारी होती. त्यावेळेस गडकरी म्हणायचे की, मी फॉर्म भरून जाणार आणि शेवटच्या दिवशी सभा घेणार. पण त्यांना गल्लोगल्ली फिरावं लागलं.

हायकमांडचा आदेश आल्यानंतर पक्ष कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी आहे की, त्या युद्धाला पुढे गेलं पाहिजे. ही स्ट्रॅटेजी असते. स्ट्रॅटेजी काय मॅच फिक्सिंगची असते का? माझा मुद्दा हा आहे की, त्यांनी पहिले सांगायचं होतं की, त्यांना काय करायचं होतं ते.

मी तर त्यांना कोरे फॉर्म पाठवले होते. एक नाही तर दोन फॉर्म मी पाठवले होते. फॉर्म भरायला पाचच लोक होते. कुटुंबीयच होते.

प्रश्न: तुम्ही याबाबत बाळासाहेब थोरातांना विचारलं का?

नाना पटोले: सगळंच विचारलं गेलंय. मी तुम्हाला तेच सांगतोय की, आज तुमच्यासमोर जे येतंय गोदी मीडियाच्या समोर. ते सत्य नाही. फॉर्म भरायला कोण-कोण होतं याची माहिती तर तुमच्याकडे येऊ शकते. ते काही लपलेलं नाही. मी काही खोटी माहिती देतोय असंही काही नाही. कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला बोलावलं गेलं नव्हतं. फॉर्म भरायला तिथे. कारण फॉर्म भरायची परंपरा अशी आहे की, अनेक कार्यकर्त्यांना बोलावतो. ही उत्तर महाराष्ट्राची निवडणूक आहे त्यामुळे तेथील प्रमुख कार्यकर्त्यांना बोलावतो आणि त्यांच्या साक्षीने फॉर्म भरतो.

प्रश्न: सत्यजीत तांबेंची आधीच भाजपसोबत बोलणी चालू होती का?

नाना पटोले : बाहेर आल्यानंतर जे काही सत्यजीत तांबेंनी वक्तव्य केलं की, मी फडणवीस यांची मदत घेऊ शकतो. आता त्यांचं नाव घेण्याचं काय कारण होतं. नाव घेतलंय फडणवीस यांचं.

प्रश्न: काँग्रेसबाबत हे असं काही पहिल्यांदा घडतंय असं अजिबात नाही ना?

नाना पटोले : आम्ही आता ज्या काही कारवाई घेणं सुरू केलं. जी काही मनमानी चालली होती त्याविरोधात आम्ही पटापट कारवाई सुरू केली आहे. त्यातून काही सकारात्मक बाबी देखील पुढे येतात. आता असं ऐनवेळी कोणी बेईमानी करणारे असतील तर त्याला तातडीने या व्यवस्थेत राहता येणार नाही. म्हणून त्यांना आम्ही बाहेर काढतो आहे. आता आमचं स्पष्ट म्हणणं की, पक्ष म्हणूनच काम करावं. व्यक्तीसाठी काम नाही. पक्ष काही कोणाच्या घरातील नाही. काँग्रेस पक्ष हा सामान्य लोकांचा पक्ष आहे. त्यामुळे कोणीही मी म्हणजे पक्ष असं म्हणत असेल तर त्याला काही आता काँग्रेसमध्ये स्थान नाही.

प्रश्न: बाळासाहेब थोरात यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती अशाप्रकारे फॉर्म भरतो तेव्हा पक्षाबाबत काही प्रश्न नक्कीच उपस्थित होतात.

नाना पटोले: म्हणून तर आम्ही तात्काळ कारवाई केलेली आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. काल आम्ही महाविकास आघाडीचे पाचही उमेदवार जाहीर केले आहेत. जो कोणी आता या निवडणुकीत आम्ही दिलेल्या सुचनेप्रमाणे वागणार नसेल तर त्याबाबतचा विचारही केला जाईल. आम्ही सगळ्यांना सूचना केल्या आहेत की, पक्षाने दिलेल्या लाईनबरोबर राहावं. ज्याला नसेल राहायचं तर जे काय घडायचं ते घडून जाऊ द्या.

ज्याला पक्षासोबत राहायचं नसेल मग तो कोणी असेल.. ही बाब एकदम क्लिअर आहे. हायकमांडचा आदेश तोच आहे. आज राहुल गांधी हे कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा करत आहेत. देशातील प्रत्येक जातीधर्माला जोडून काँग्रेसचा विचार जो आहे तो देण्याचा काम राहुल गांधी करत आहे. पण भाजप हे देशाला तोडण्याचं काम करतंय. संविधानाला व्यवस्थेला तोडण्याचं काम करतंय. त्यामुळे भाजपसोबत त्या विचारांशी जे कोणी जोडलं जात असेल ते काँग्रेसचे होऊ शकत नाही. त्यामुळे आमची स्पष्ट भूमिका आहे की, पक्षाने जो निर्णय दिला आहे. त्या निर्णयाबरोबर राहावं. ज्यांना राहायचं नसेल तो त्यांचा प्रश्न आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. त्याआधारेच हे काम चालेल. पक्ष कोणाच्या घरचा नाही. ही लढाई समोरासमोर लढू. मागून वार करणाऱ्यांना कुठलंही स्थान पक्षात दिलं जाणार नाही.

प्रश्न: काँग्रेसमध्ये संस्थानिक राजकारणी भरपूर राहिले आहेत. तर तुमची लढाई या सगळ्या घराण्यांसोबत आहे का?

नाना पटोले: आज जी काही राहुल गांधींच्या लढाईत लोकं सामील झाले आहेत कोणी आपल्या कर्माने मोठा झाला असेल तो आजही काँग्रेस विचाराने प्रेरीत आहे. पण स्वत:ला वाचविण्यासाठी.. म्हणून मी हर्षवर्धन पाटलांना कोट केलं. जी कोणी मंडळी असतील..

लोकं आता ओळखून आहे. मी जनतेमुळे नेता होतो. संस्थानिक असला तरी तो काही लोकांच्या घरच्या चुली पेटवायला नाही जात. ज्या पक्षाने तुम्हाला स्थान दिलं, महत्त्व दिलं.. त्या पक्षाच्या अडचणीच्या काळात सोबत राहणं गरजेचं आहे.

तांबे कुटुंबीयांना सांगितलं असतं की, आम्हाला तरूण पोराला तिकीट द्यायचं आहे तर आमचा काही विरोधच नव्हता ना. आमचा कुठे विरोधच नाही. त्यांना असं करण्याची काय गरज पडली?

भाजपचा कोण उमेदवार आहे त्यावरुन आपण ठरवू.. असं तर होणार नाही ना.. याचा अर्थ पक्ष माझ्या घरातील होईल असं समजून चालेल का कोणाला? माझा सवाल आहे.

पक्ष तुमच्या घरचा नाही. तुम्ही पक्षाला सांगायला पाहिजे होतं की, मी तीन टर्म आमदार होतो. माझं वय झालं. मी विधानपरिषदेत सुधीर तांबेंना पक्ष नेता केलं. आम्ही सगळा मानसन्मान दिला. तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं की, माझ्याऐवजी माझ्या मुलाला तिकीट द्या. तर मी म्हटलं नसतं की, तुमच्याच पोराला का? दुसऱ्या पोराला का नाही. ती वेळही नव्हती. ऐनवेळी अशा पद्धतीने करायचं

फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी मी त्यांच्याशी बोलत होतो. साधं आम्हाला सांगावं नाही. म्हणून मी सांगतो की, माझं संस्थानिकांविरोधात भूमिका नाही. आम्हाला सगळ्याच लोकांची गरज आहे. पण ज्या पक्षासोबत वेळेवर विश्वासघात केला. ते अजिबात चालणार नाही.

यामुळे कोण मोठा माणूस आहे आणि तो आम्हाला नको अशी काही भूमिका नाही. पक्षासोबत राहायचं असेल तर प्रामाणिक राहायला लागेल. वेळेवर अशा पद्धतीचा धोका होत असेल तर आज उद्रेक किती मोठा आहे याचा तुम्हाला अंदाज नाही.

जनसामान्यांच्या भावना तुम्हाला कळत नाही. महाराष्ट्रभरातून मला किती मेल आले. चार मेल विरोधातील आले असतील. पण अनेक मेल, मेसेज मला आले की, तुम्ही चांगला निर्णय घेतला. अशा वेळेवर धोका देणाऱ्या लोकांना हीच खरी शिक्षा आहे.

काँग्रेस आजपर्यंत असे निर्णय घेत नव्हती. पण आपण आज हा निर्णय घेतला त्याबाबत लोकांनी माझे आभार व्यक्त केले.

मी माझी भूमिका तुम्हाला सांगतो. मी कोणाशी दगाबाजी केली नाही. जे काही केलं ते मी समोरुन केलं. मी काही खुर्ची राहून असं काही लफडी करत बसलो नाही. जे आहे ते समोरुन बोललो.

    follow whatsapp