जळगाव : मराठा समाजाबद्दल अक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप असलेले वादग्रस्त पोलिस निरीक्षक किरण बकाले यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली. जातीयवादी नीच प्रवृत्तीचा पोलीस अधिकारी किरण बकाले अखेर निलंबित… खातेनिहाय चौकशी होऊन बडतर्फ होईपर्यंत लढा सुरूच राहणार.!!! अशी माहिती त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून दिली.
ADVERTISEMENT
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही या प्रकरणात ट्विट करुन किरण बकाले यांना निलंबित करावे अशी मागणी केली होती. “मराठा समाजावर अत्यंत हीन भाष्य करणारा नीच प्रवृत्तीचा पीआय किरण बकाले ला तात्काळ निलंबित करावे. एखाद्या पोलीसाने कोणत्याही समाजाबद्दल आकसभाव ठेवणे हे सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. अशी प्रवृत्ती पोलीस खात्यातून हद्दपार करावी.” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते.
नेमकं प्रकरण काय?
किरण बकाले यांची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये गणेश विसर्जन बंदोबस्ताबाबतचा संवाद ऐकू येत आहे. या संवादामध्ये एक पोलिस बकाले यांना दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्यांचा तपशील सांगत आहे. या बातम्यांमध्ये बंदोबस्तावेळी हजर अससलेल्या पोलिसांऐवजी दुसऱ्यांचीच नावे छापून आल्याचे सांगितले आहे. यावर पीआय बकाले यांनी नाव वगळणाऱ्या संबंधिताला शिवीगाळ करत असून याचवेळी त्यांनी सर्व मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचे ऐकू येत आहे.
ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर बकाले यांच्याविरुद्ध संतप्त वातावरण तयार झाले होते. याबाबत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस अधीक्षकांकडे केल्यानंतर बकाले यांची स्थानिक गुन्हे शाखेतून पोलीस मुख्यालयात तडकाफडकी बदली करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही वादावर पडदा पडला नाही. आमदार चव्हाणा यांनी किरण बकाले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. अन्यथा मराठा समाजाच्या १० हजार व्यक्तींना सोबत घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा आणि त्यावेळी कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पोलिस प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा दिला होता.
ADVERTISEMENT