कोरोना लसीमुळे तयार झालेली इम्युनिटी किती दिवसानंतर कमी होते?; भारतात करण्यात आला अभ्यास

मुंबई तक

• 01:31 AM • 20 Jan 2022

कोविड लस घेतल्यानंतर शरीरात निर्माण होणारी कोरोनाविरोधी प्रतिकारक शक्ती (इम्युनिटी) किती दिवस टिकून राहते, याबद्दल जगभरात अभ्यास केला जात आहे. भारतातही लसीमुळे निर्माण होणाऱ्या इम्युनिटीबद्दल अभ्यास करण्यात आला असून, त्यातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोरोना लस घेतलेल्या १० व्यक्तींपैकी ३ व्यक्तीच्या शरीरात लसीमुळे निर्माण झालेली इम्युनिटी ६ महिन्यानंतर संपते, असं या अभ्यासात आढळून आलं […]

Mumbaitak
follow google news

कोविड लस घेतल्यानंतर शरीरात निर्माण होणारी कोरोनाविरोधी प्रतिकारक शक्ती (इम्युनिटी) किती दिवस टिकून राहते, याबद्दल जगभरात अभ्यास केला जात आहे. भारतातही लसीमुळे निर्माण होणाऱ्या इम्युनिटीबद्दल अभ्यास करण्यात आला असून, त्यातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोरोना लस घेतलेल्या १० व्यक्तींपैकी ३ व्यक्तीच्या शरीरात लसीमुळे निर्माण झालेली इम्युनिटी ६ महिन्यानंतर संपते, असं या अभ्यासात आढळून आलं आहे.

हे वाचलं का?

हैदराबाद येथील AIG हॉस्पिटल आणि एशियन हेल्थकेअर यांनी कोरोना लसीमुळे निर्माण होणाऱ्या इम्युनिटीच्या कालावधीबद्दल भारतात अभ्यास केला. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या १,६३६ व्यक्तींना या अभ्यासासाठी सहभागी करून घेण्यात आलं होतं.

Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात रुग्णसंख्येची उसळी; २१४ जण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह

अभ्यासाबद्दल AIG रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. नागेश्वर रेड्डी म्हणाले, ‘लसीमुळे शरीरामध्ये निर्माण होणारी इम्युनिटी किती दिवस टिकून राहते, हे जाणून घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला. त्याचबरोबर कोणत्या व्यक्तींना लसीच्या बुस्टर डोजची गरज आहे, याचाही शोध घ्यायचा होता.’

‘कोरोनाविरोधी अॅण्टीबॉडीजचा अभ्यास करण्यात आला. करण्यात आलेल्या अभ्यासानुसार ज्या व्यक्तींच्या शरीरात अॅण्टीबॉडीजचा स्तर 15AU/ML आहे. त्या व्यक्तींच्या शरीरातील इम्युनिटी संपली आहे. तर ज्या व्यक्तींमध्ये अॅण्टीबाडीजचा स्तर 100 AU/ml आहे. त्यांच्या शरीरात इम्युनिटी टिकून आहे,’ असं यातून दिसून आलं. कोरोनाविरोधात अॅण्टीबाडीजचा स्तर 100 AU/ml असणं आवश्यक आहे. यापेक्षा कमी असेल, तर त्या व्यक्तीला कोरोना संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे’, असं रेड्डी म्हणाले.

कोरोना चाचण्या वाढवा, केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना

अभ्यासात काय आढळून आलं?

१,६३६ व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. यात ९३ टक्के व्यक्तींनी कोविशील्ड, तर ६.२ टक्के व्यक्तींनी कोव्हॅक्सिन आणि १ टक्के व्यक्तींनी स्पुटनिक लस घेतलेली होती.

जवळपास ३० टक्के व्यक्तींच्या शरीरात निर्माण झालेल्या इम्युनिटीचा स्तर सहा महिन्यांनंतर 100 AU/ml पेक्षा कमी झाल्याचं आढळून आलं.

उच्च रक्तदाब आणि मधुमेह यासारख्या आजारांनी ग्रासलेल्या ४० वर्षांवरील व्यक्तींमधील इम्युनिटी प्रभावहीन झाल्याचं अभ्यासातून समोर आलं. यात ६ टक्के लोक असे होते, ज्यांच्या शरीरात अजिबातच इम्युनिटी शिल्लक राहिलेली नाही.

ज्येष्ठ व्यक्तींच्या तुलनेत तरुणांमध्ये अधिक काळ इम्युनिटी टिकून राहत असल्याचं या अभ्यासात दिसून आलं. तर गंभीर आजारांनी ग्रासलेल्या ४० वर्षांपुढील व्यक्तींच्या शरीरातील इम्युनिटी ६ महिन्यानंतर कमी होत असल्याचं डॉ. रेड्डी यांनी सांगितलं.

नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, Corona Pandemic ची परिस्थिती नियंत्रणात – महापालिकेची हायकोर्टात माहिती

‘भारतात ३० टक्के व्यक्ती अशा आहेत, ज्यांना गंभीर आजार आहेत. दोन्ही डोज घेतल्यानंतरही त्यांच्या शरीरात इम्युनिटी ६ महिन्यानंतर संपून जात आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना बुस्टर डोज देण्याबद्दल विचार केला गेला पाहिजे’, असं रेड्डी यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp