मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक नुकतंच जाहीर करण्यात आलं आहे. लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटवर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. दरम्यान, यावेळी आयोगाने सोशल मीडियावर देखील वेळापत्रक अपलोड करुन माहिती दिली आहे. जेणेकरुन परीक्षार्थींना परीक्षेबाबत तात्काळ माहिती मिळेल.
ADVERTISEMENT
लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा परीक्षा, महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित याशिवाय इतरही काही महत्त्वाच्या परीक्षा घेतल्या जातात. त्याच परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक आता जाहीर करण्यात आलं आहे.
एमपीएससी आयोगाच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या या परीक्षा 2 जानेवारी 2022 पासून सुरु होणार आहेत. दरम्यान, परीक्षेसाठी अर्ज करण्याची 25 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. आज MPSC च्या मार्फत कोणकोणत्या मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहेत तसेच त्या किती तारखेला होणार आहेत. यासंदर्भातील माहिती MPSC कडून काही वेळापूर्वीच सोशल मीडियावर देखील देण्यात आली आहे.
एमपीएससी अंतर्गत स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम, निवड आणि परीक्षेची नेमकी योजना कशाप्रकारे असेल या सगळ्या बाबतीची माहिती आयोगाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे. मात्र हे वेळापत्रक अंदाजित आहे त्यामुळे परीक्षेच्या नेमक्या तारखेत काही बदल देखील होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जर परीक्षेच्या तारखेत अथवा इतर गोष्टीत काही बदल झाले तर त्याबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येईल. परीक्षेच्या प्रस्तावित महिना दिनांकमध्ये काही बदल होण्याची शक्यताही आहे. या परीक्षेमध्ये काही बदल केल्यास ते आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. अंदाजित वेळापत्रकाबाबतची अपडेटेड माहिती प्रत्येक वेळी एमपीएससीच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचंही आयोगाने स्पष्ट केलं आहे.
मागील दोन वर्षांपासून स्पर्धा-परीक्षांबाबतच्या तारखांबाबत आणि एकणूच परीक्षेबाबत गोंधळ पाहायला मिळत आहे. कोरोनाच संकटामुळे अनेकदा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, आता परीक्षेचं अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Mega Recruitment: MPSC मार्फत 15 हजार 511 पदांची भरती; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने आता महाराष्ट्रातही एंट्री झाल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. अशावेळी अंदाजित वेळपत्रक जरी जाहीर करण्यात आलं असलं तरीही नेमकी परीक्षा कशी होणार याकडे लाखो विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
ADVERTISEMENT