कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत कमालीची सुधारणा होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात नवीन रुग्णसंख्येपेक्षा कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आजही शहरात १ हजार ४४७ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून २ हजार ३३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज ६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत.
ADVERTISEMENT
मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासनाने केल्या काही दिवसांपासून लॉकडाउनच्या माध्यमातून अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. ज्याचा फायदा वाढती रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात झाला आहे. परंतू मुंबईत अनेक केंद्रावर लसीचा तुटवडा असल्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. सध्या शहरातला मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यात पालिकेला यश आलं असलं तरीही हा मृत्यूदर कमी होण्याची गरज अनेक तज्ज्ञांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे तोपर्यंत महापालिकेला अशाच पद्धतीने प्रयत्न करण्याची गरज आहे. दरम्यान एकीकडे मुंबईतली परिस्थिती सुधारत असली तरीही WHO ने भारतामधल्या दुसऱ्या लाटेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परीणाम भारतात मोठ्या प्रमाणावर दिसून येतो आहे. कोरोनाची दुसरी लाट जीवघेणी ठरली आहे. भारतातली स्थिती अत्यंत चिंताजनक आहे असं वक्तव्य आता WHO चे प्रमुख टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी म्हटलं आहे. फक्त भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी दुसरी लाट भीषण ठरली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
भारतातली स्थिती चिंताजनक
भारतातली आरोग्य स्थिती आणि कोरोनाची लाट ही अत्यंत चिंता वाढवणारी आहे. भारतातल्या अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. रूग्णालयांमध्ये रूग्ण दाखल होत आहेत. अनेक मृत्यूही होत आहेत. भारतात रोज जवळपास चार हजारांच्या आसपास मृत्यू नोंदवले जात आहेत. ही बाब चिंतेचा विषय असल्याचंही ट्रेडोस यांनी म्हटलं आहे. WHO ने भारतातल्या कोरोना स्थितीचं बारकाईने निरीक्षण सुरू केलं आहे. तसंच भारताला जी मदत लागणार आहे ती देखील पोहचवली जाते आहे. WHO च्या मदतीने भारतात अनेक ऑक्सिजन कंसंट्रेटरही पाठवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मास्क आणि इतर वैद्यकीय साधनंही पाठवण्यात आली आहेत.
ADVERTISEMENT