भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी डॉक्टरची भर रस्त्यात हत्या, धक्कादायक घटना उघडकीस

मुंबई तक

• 04:00 AM • 16 Jan 2022

भास्कर मेहेरे, यवतमाळ: डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दोन वर्षापूर्वी आपल्या भावाचा मृत्यू झाला असा समज करून एका 22 वर्षीय तरुणाने मित्राच्या मदतीने उमरखेडमधील डॉक्टर हनुमंत धर्मकारेची गोळ्या घालून हत्त्या केल्याचं उघडकीस आलं आहे. या घटनेनंतर परिसरात कमालीची दहशत पसरली आहे. आता याप्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड येथे 11 जानेवारी रोजी डॉक्टर हनुमंत […]

Mumbaitak
follow google news

भास्कर मेहेरे, यवतमाळ: डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दोन वर्षापूर्वी आपल्या भावाचा मृत्यू झाला असा समज करून एका 22 वर्षीय तरुणाने मित्राच्या मदतीने उमरखेडमधील डॉक्टर हनुमंत धर्मकारेची गोळ्या घालून हत्त्या केल्याचं उघडकीस आलं आहे. या घटनेनंतर परिसरात कमालीची दहशत पसरली आहे. आता याप्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे.

हे वाचलं का?

यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड येथे 11 जानेवारी रोजी डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांची गोळ्या घालून हत्त्या करण्यात आली होती. या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली होती. डॉक्टरच्या हत्येनंर आरोपी फरार झाला होता. आरोपीचा सुगावा लागत नसल्याने येथील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष होता. अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी म्हणजे मे 2019 मध्ये शेख अरबाज शेख अब्रार याचा उमरखेड शहरातील शिवाजी चौक जवळ मोटार सायकलने अपघात झाला होता. या अपघातात अरबाज गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालय उमरखेड येथे दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान जखमी अरबाजचा मृत्यू झाला. त्या वेळेस डॉ. हनुमंत धर्मकारे हे कर्तव्यावर होते. त्यांच्या हलगर्जीपणा मुळेच जखमी अरबाजचा मृत्यू झाला असा नातेवाईकानी आरोप केला होता. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात देखील गेलं होतं.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला होता. मात्र, त्यावेळेस मृतकाचा लहान भाऊ एजाज अब्रार शेख आणि इतर नातवाईकांनी डॉक्टरला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. याच घटनेच्या आधारे पोलिसांनी तपास चक्र फिरवलं. सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेला संशयित हा शेख एजाज शेख याच्या शरीरयष्टीचा दिसत असल्याने पोलिसांनी गोपनीय बातमीदार नेमून याबाबत सगळी माहिती काढली.

त्यावेळी पोलिसांना समजलं की, एजाज उर्फ अप्पू शेख अब्रार याने आपले मामा आणि मित्रांच्या साहाय्याने डॉक्टरवर गोळया झाडून त्याची हत्या केली. आरोपीने आपल्या मृत भावाचा बदला घेण्याच्या उद्देशाने डॉक्टरची हत्त्या केली. या प्रकरणी पोलिसांनी सैय्यद तौसिफ सय्यद खलील, सय्यद मुश्ताक सय्यम खलील, शेख मौहसीन शेख कयुम, शेख शाहरुख शेख आलम यांना अटक केली आहे.

यवतमाळ : अज्ञात युवकाने केलेल्या गोळीबारात शासकीय रुग्णालयातील डॉक्टरचा मृत्यू

11 जानेवारीला हनुमंत धर्मकारे यांची उमरखेड शहरातील साकळे विद्यालयासमोर दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर यवतमाळमधील डॉक्टर रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी करत होते. तसेच रुग्ण सेवाही बंद करण्यात आली होती. त्यामुळे आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढला होता. पोलिसांनी सुद्धा तपास गांभीर्याने घेऊन वेगवेगळ्या मार्गाने तपास करून अखेर आरोपीला अटक केली होती.

    follow whatsapp