बांधकाम परवानग्यांमधील अनियमीततेवर बोट ठेवत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाच माजी आयुक्तांसह १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याने या गुन्ह्याची नोंद केली असून फसवणूक, अनियमीतता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये माजी आयुक्त गोविंद राठोड, रामनाथ सोनावणे, एस.एस.भिसे, ई.रविंद्रन, गोविंद बोडके यांचा समावेश आहे.
माजी अपक्ष नगरसेवक अरुण गीठ यांच्या तक्रारीनंतर प्रथमदर्शनी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतंय. तक्रारदाराच्या वकिलांनी केलेल्या तक्रारी व युक्तिवादाच्या आधारे दिवाणी न्यायाधीश अक्षय कपाडिया आणि न्याय दंडाधिकारी सोनाली शशिकांत राऊळ यांनी १८ जानेवारी २०२२ ला हा आदेश दिला होता. नागरी अधिकारी आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगर नियोजकांनी विकासकाशी संगनमत करून सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे. निर्धारित नियमांचे पालन न करून मालमत्तेच्या विकासास परवानगी देण्यात आल्याचं तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले होते.
एफएसआय देण्याबाबत मालमत्ता विकासकाची अवाजवी बाजू घेण्यात आली आणि त्याने अनेक अनियमित नियमांना पाठीशी घातले आहे. त्यामुळे बांधकाम नियमांचे हे सर्वजण पूर्णपणे उल्लंघन करत होते. तसेच नागरी अधिकारी आणि विकासक यांच्यातील बैठकाही इतिवृत्त म्हणून बनावट होत्या असा आरोप तक्रारदाराने केला आहे. तक्रारदाराने स्थानिक पोलीस आणि विभागीय आयुक्तांसह वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्यासाठी संपर्क साधला मात्र त्यांनी कोणतीही दखल न घेतल्याने त्यांना न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागले.
बाजारपेठ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, कथित आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम 420, 418, 415, 460, 448, 120 B, 34 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 9 आणि 13 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. हा संपूर्ण प्रकार जानेवारी 2004 च्या दरम्यान घडला असल्याचं पोलिसांनी नोंदवलेल्या या एफआयआरमध्ये म्हटले आहे. भूखंडावर २३ मजली स्काय स्क्रॅपर आले आहे आणि विकासकाने गॅरेजचे दुकानात रूपांतर केले आहे.
ADVERTISEMENT