महाराष्ट्रात कोरोना खूप वेगानं पसरतोय. त्याला रोखण्यासाठी सरकारने कोरोना प्रतिबंधक नियम आणखी कडक केलेत. काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनही लावलाय. पुण्यातही मास्क न वापरणाऱ्यांकडून दंड वसूल केला जातोय. पण आज शिवनेरी किल्ल्यावर कोरोना नियमांचं उल्लंघन होताना दिसलं.
ADVERTISEMENT
शिवजयंतीनिमित्त आज शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तसंच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सोहळा झाला. कोरोनाकाळात पहिल्यांदाच शिवजयंतीचा सोहळा साजरा होतोय. त्यामुळे सरकारनं शिवजयंती साजरी करण्यासाठी काही नियम जारी केले होते.
मात्र या नियमांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या साक्षीनंच पायमल्ली झाल्याचं शिवनेरीवर बघायला मिळालं. लोक एकमेकांना खेटून, मास्कविना गर्दी केल्याचं दिसलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मास्क घातलेला होता.
राज्य सरकारच्या सूचनेनुसार, पुणे जिल्हा प्रशासनाने शिवनेरी येथील शिवजयंती महोत्सव साध्या पद्धतीनेच साजरा करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. या कार्यक्रमास १०० व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बुधवारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. तसंच सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर निर्बंध घालण्यात आलेत.
मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात येणार असून लग्न समारंभात मास्कसह इतर नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळलं, तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं होतं.
शिवनेरीवरील कार्यक्रमानंतर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांनी निष्काळजीपणा केला तर कडक धोरण अवलंबवावं लागेल, असा इशारा दिला. पण खुद्द उपमुख्यमंत्र्यांच्या समोरच अनेकजण विनामास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता एकत्र आल्याचं बघायला मिळालं. त्यामुळे सरकारच्या कोरोना प्रतिबंधक धोरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेत.
ADVERTISEMENT