दहीहंडी आणि गणेश उत्सव दणक्यात साजरे करता येतील, कुठलेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दहीहंडीचा सण असेल किंवा गणेश उत्सव असेल प्रत्येक सण अत्यंत दणक्यात साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मूर्तीकारांना जागा उपलब्ध करून देणार आहे. तसंच मूर्तींच्या उंचीवर कुठलंही बंधन नसणार असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं.
ADVERTISEMENT
कोरोनामुळे मागच्या दोन वर्षांपासून गणेश उत्सव, दही हंडी यासह सगळ्या उत्सवांना निर्बंध होते. दोन वर्षे लोकांनी गणेश उत्सव तसंच सगळे सण साधेपणाने साजरे केले गेले. मात्र आता सगळे निर्बंध हटवण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने जे निर्देश दिले आहेत ते पाळून हे उत्सव साजरे केले जावेत असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. यावर्षीचे उत्सव-सण हे निर्बंधाशिवाय साजरे होतील असंही एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून ब्रेक लागलेल्या दहीहंडी आणि गणेशोत्सवला यंदा हिरवा कंदील मिळाला आहे. कोरोना निर्बंधाच्या विघ्नात अडकलेला दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. यंदा गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाला कोणतेही निर्बंध असणार नाही हेदेखील जाहीर करण्यात आलं आहे.
मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाचं संकट राज्यावर होतं. ते लक्षात घेऊनच निर्बंध लावण्यात आले होते. मात्र आता सगळे निर्बंध काढले गेले आहेत. त्याचप्रमाणे गणेश उत्सवाच्या दरम्यान कायदा-सुव्यवस्था पालन करण्यात यावं यासाठी पोलिसांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत असंही एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे.
गणोशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे. या सणानिमित्त लोक आपापल्या घरी जातात. अशा चाकरमानींच्या सोयीसाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोल माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यामुळे या सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी गणपती उत्सवानिमित्त एकूण 214 विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत या गाड्या चालवण्यात येणार आहेत.
ADVERTISEMENT