पक्षनेतृत्वावर गंभीर आरोप करत पक्षाला रामराम ठोकलेल्या हार्दिक पटेलने काँग्रेसवर आणखी एक टीकेचा बाण सोडला आहे. काँग्रेस हा सर्वात मोठा जातीयवादी पक्ष असल्याची टीका हार्दिकने केली आहे. तो अहमदाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होता.
ADVERTISEMENT
“गुजरात काँग्रेसचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून आपली नेमणूक केल्यानंतरही मला कोणतेच अधिकार देण्यात आले नाही. माझं पद हे फक्त कागदावर होतं.” यावेळी हार्दिक पटेलने भाजप सहभागाच्या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. भाजपमध्ये सहभागी होण्याबद्दल मी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचं हार्दिकने स्पष्ट केलं.
पाटीदार समाजातील ज्येष्ठ नेते आणि मित्रांनी मला काँग्रेसमध्ये दाखल होऊ नकोस म्हणून बजावलं होतं. परंतू त्यावेळी मी त्यांचं ऐकलं नाही. आज मला त्याचा प्रत्यय येतोय. म्हणूनच मी आज त्या सर्वांची माफी मागतो आहे, असंही हार्दिक पटेलने सांगितलं.
यावेळी बोलत असताना हार्दिक पटेलने काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. “राहुल गांधी यांच्या दाहोड येथील आदिवासी संघर्ष यात्रेत 25 हजार लोकं उपस्थित होती. परंतू प्रत्यक्षात खर्चाचं बील दाखवताना 70 हजार लोकं उपस्थित असल्याचं दाखवलं गेलं. अशा प्रकारचा भ्रष्टाचार काँग्रेसमध्ये सुरु आहे”, असं हार्दीक म्हणाला.
“राहुल गांधी जेव्हा गुजरातमध्ये दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्या दौऱ्यात गुजरातच्या एकाही समस्येवर चर्चा झाली नाही. राहुल गांधी गुजरातमध्ये आले की इथले नेते त्यांना चिकन सँडवीच मिळालं की नाही, डाएट कोक मिळालं की नाही याच्याच चिंतेत असायचे. जातीचं राजकारण सोडलं तर काँग्रेसमध्ये काहीच होत नाही.” काँग्रेस पक्षाचं नेतृत्व हे फक्त एकाच परिवाराभोवती फिरत असल्याचं हार्दिक पटेल म्हणाला.
ADVERTISEMENT