नवी दिल्ली: अमेरिकन कंपनी मॉडर्नाच्या (Moderna) कोरोना लसीच्या (Corona Vaccine) आपत्कालीन वापरासाठी आता डीसीजीआयने (DCGI) मान्यता दिली आहे. आता सिप्ला (Cipla) ही लस भारतात आयात करू शकणार आहे. याबाबतची माहिती नीति आयोगाचे सदस्य व्हीके पॉल यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
यावेळी व्ही के पॉल असं म्हणाले की, ‘आम्ही लस क्षेत्रात विक्रमी कामगिरी केलेली आहे. आता मॉडर्ना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ही पहिली परदेशी लस आहे की ज्याची संपूर्ण चाचणी ही परदेशातच झाली आहे आणि ज्याचा वापरला आता भारत सरकारने मंजुरी दिली आहे. कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड, स्पुटनिक आणि मॉडर्ना अशा एकूण चार लसी आता देशात उपलब्ध आहेत.’ अशी माहिती व्ही के पॉल यांनी दिली आहे.
मॉडर्ना लस खरेदीसाठी सिप्ला कंपनीला DCGI कडून मंजुरी
कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक-V या लसीनंतर आता मॉडर्ना ही चौथी लस आहे ज्या लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. मुंबई येथील फार्मा कंपनी सिप्लाने देखील मॉडर्ना लसीच्या आयात आणि मार्केट अथॉराइजेशन मंजुरी मागितली होती. ज्याला डीसीजीआयने मंजुरी दिली आहे.
DCGI ने 1 जून रोजी परदेशी लसांच्या नियमांमध्ये शिथिलता आणली होती. DCGI ने सांगितले होते की, ज्या लसीला अमेरिका, युरोप, यूके, जपान किंवा WHO कडून जर मंजुरी मिळाली असेल तर त्या लसीची पुन्हा भारतात चाचण्या घेण्याची गरज नाही.
जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO)कडून मॉडर्ना लसीला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. डब्ल्यूएचओच्या मते, कोरोनाविरूद्ध मॉडर्नाची लस ही जवळजवळ 94.1 टक्केपर्यंत प्रभावी आहे. याबाबत WHO चं असं म्हणणं आहे की, मॉडर्ना लसीच्या पहिल्या डोस घेतल्याच्या 14 दिवसानंतर कोरोना होण्याचा धोका हा 94.1 टक्क्याने कमी होतो.
Sputnik-V: सीरम आता भारतात बनवणार रशियन बनावटीची स्पुटनिक-V लस, DCGI ची मंजुरी
ही लक्षात घेण्यासारखे गोष्ट आहे की, मॉडर्ना लसीच्या व्यतिरिक्त फायझरच्या लसीला देखील लवकरच मंजुरी मिळू शकते. अलीकडेच फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बॉर्ला यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते की, ‘भारतात फायझरच्या लसीला मान्यता देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच कंपनी भारत सरकारबरोबर झालेल्या करारास अंतिम रूप देऊ शकेल.’
सध्या देशात कोरोनाचे रुग्ण जरी कमी झाले असले तरी आता कोरोनाचा नवा स्ट्रेन जो डेल्टा प्लस व्हेरिएंटने ओळखला जात आहे त्याच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. अशावेळी सरकारने कोरोनाच्या या नवीन संकटापासून बचाव करण्यासाठी लसीकरणावर जोर दिला आहे. अशा परिस्थितीत मॉडर्ना लसीला मंजुरी दिल्याने लसीकरण गती वाढविण्यास अधिक मदत होणार आहे.
ADVERTISEMENT