प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत शेतकरी आंदोलनातील ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी पंजाबी अभिनेता दीप सिद्धूला अटक केली. ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचारात काही शेतकऱ्यांनी पोलिसांनी केलेलं बॅरिकेडींग मोडत लाल किल्ल्यात प्रवेश केला होता. आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी दिल्ली पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्लाही केला. शेतकऱ्यांना हिंसेसाठी भडकवण्याचा आरोप दीप सिद्धूवर ठेवण्यात आला आहे. मंगळवारी दीप सिद्धूला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं ज्यात त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
ADVERTISEMENT
दिल्ली पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीप्रमाणे, ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचारानंतर दीप सिद्धू लाल किल्ल्यामधून बाहेर पडला आणि त्यानंतर त्याने एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रात्र घालवली. या हॉटेलमध्ये त्याने काही लोकांची भेटही घेतली, ही लोकं नेमकी कोण होती याचा तपास सुरु असल्याचंही दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं. यानंतर दुसऱ्यात दिवशी दीप सिद्धूने हॉटेल सोडण्याचा निर्णय घेतला.
पंजाबी चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे दीप सिद्धूचं नाव चांगलं प्रसिद्ध आहे. याच कारणामुळे त्याला पंजाब-हरियाणा सीमेवर अनेक लोकांनी आसरा दिला. एवढे दिवस याच भागात दीप सिद्धू लपला होता. दरम्यानच्या काळात दीप सिद्धू मोबाईल फोन वापरत नसल्यामुळे त्याचा माग काढणं कठीण झालं होतं. आपण कुठे लपलो आहेत हे समजू नये यासाठी दीप सिद्धू आपल्या मित्र परिवाराशीही बोलणं टाळत होता, याचसोबत तो एकच कपडे पाच दिवस घालून राहत होता.
दिल्ली पोलिसांनी दीप सिद्धूची माहिती देणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. अटक टाळण्यासाठी पळालेला दीप सिद्धू आपल्या मित्राच्या मोबाईल व्हिडीओ शूट करुन कॅलिफोर्नियायेथील आपल्या एका मैत्रिणीला फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करायला सांगायचा. दीपच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांची पाच ते सहा पथकं पंजाब-हरियाणा भागात गस्त घालत होती. परंतू पंजाब पोलिसांकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्यामुळे त्याच्या अटकेसाठी वेळ लागल्याचं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं.
दीप सिद्धूची बायको ही मुळची झारखंडची असली तरीही ती सध्या बिहारमध्ये राहत आहे. आपल्या बायकोला भेटण्यासाठी दीप सिद्धू बिहारमध्ये जाणार होता, पण बायकोच्या घरावरही पोलिसांची पाळत असल्याचं समजताच त्याने हा प्लान रद्द केला. यानंतर दीपने हरियाणातील कर्नाल भागात राहणाऱ्या आपल्या एका मित्राला संपर्क साधून राहण्याची व्यवस्था आणि एका कारची सोय करायला सांगितली. दिल्ली पोलिसांना या प्लानची माहिती समजताच त्यांनी सापळा रचत दीप सिद्धूला अटक केली.
ADVERTISEMENT