‘हे इतिहासात पहिल्यांदा घडलं’; विश्वासघातकी शब्दावरून केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

मुंबई तक

28 Jul 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:54 AM)

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदार, खासदार आणि नेत्यांना गद्दार ऐवजी विश्वासघातकी म्हटलं आहे. त्यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. थेट अमेरिकेच्या अध्यक्षांचं उदाहरण देत दीपक केसरकरांनी तुम्हाला विश्वासघातकी म्हणण्याचा अधिकारी नाही, असं उद्धव ठाकरेंना उद्धेशून म्हटलं आहे. दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना […]

Mumbaitak
follow google news

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदार, खासदार आणि नेत्यांना गद्दार ऐवजी विश्वासघातकी म्हटलं आहे. त्यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. थेट अमेरिकेच्या अध्यक्षांचं उदाहरण देत दीपक केसरकरांनी तुम्हाला विश्वासघातकी म्हणण्याचा अधिकारी नाही, असं उद्धव ठाकरेंना उद्धेशून म्हटलं आहे.

हे वाचलं का?

दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उलट सवाल केले. केसरकर म्हणाले, “आम्हाला गद्दार का म्हणता, यावर आम्ही आक्षेप घेतोय. कारण आम्ही शिवसेना सोडलेली नाही. त्यावर त्यांनी गद्दार ऐवजी विश्वासघातकी शब्द वापरला. तुम्हाला जर वापरायचा असेल, तर एक आदेश काढा आणि तुमच्या लोकांना सांगा. पेपरमध्ये एक ओळ देऊन काहीही होत नाही. विश्वासघातकी कुणाला म्हणता तुम्ही. ज्याच्यावर विश्वास टाकला आणि त्याने घात केला असेल, त्याला म्हणतात.”

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यावरून केसरकर उद्धव ठाकरेंना काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंनी आजारपणातही मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वतःकडेच ठेवला होता. त्यावरुन दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. “भारताच्या आणि जगाच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलं आहे. महत्त्वाचं ऑपरेशन असतं आणि राज्याचे प्रमुख आपल्या पदाचा पदभार दुसऱ्याकडे देत नाहीत. हे इतिहासात पहिल्यांदा घडलं आहे.”

Deepak Kesarkar: “अनिल परब यांचा फोन तपासा म्हणजे कळेल ठाकरे-फडणवीस यांचं…”

“जगातील सर्वात मोठी महासत्ता अमेरिका आहे. तिथल्या अध्यक्षांना गुंगी द्यायची असेल, तर त्यांनी १ तास ४० मिनिटांसाठी उपाध्यक्षांकडे पदभार दिला होता. ही वस्तुस्थिती आहे. अनेकवेळा मुख्यमंत्री आजारी पडले. परदेशात गेले. त्यावेळी प्रत्येकाने आपल्या पक्षातील ज्येष्ठ व्यक्ती पदभार दिला होता. मग आमचे मुख्यमंत्री आजारी होते आणि कधीतरी तुम्हाला मुख्यमंत्री बनवेल, असं आश्वासन त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेलं असेल, तर ते (उद्धव ठाकरे) त्यांना (एकनाथ शिंदे) प्रभारी मुख्यमंत्री बनवू शकले असते. मग का बनवलं नाही?,” असा सवाल केसरकरांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

‘एकनाथ शिंदेंवर विश्वास नव्हता, तर उद्धव ठाकरे सुभाष देसाईंना मुख्यमंत्री बनवू शकले असते’

यावरून पुढे बोलताना केसरकर म्हणाले, “तितका सुद्धा विश्वास तुमचा (उद्धव ठाकरे) त्यांच्यावर (एकनाथ शिंदे) नव्हता का? त्यांच्यावर विश्वास नव्हता, तर मग सुभाष देसाई यांना बनवू शकला असता. हे सगळं लक्षात घेतल्यानंतर तुम्ही जर विश्वास ठेवला, तर तुम्हाला विश्वासघातकी म्हणायचा अधिकार आहे. नाहीतर तुम्हाला विश्वासघातकी म्हणायचा अधिकार नाही, कारण ज्या माणसाने आयुष्य तुमच्यासाठी वेचलं आहे, त्याला विश्वासघातकी का म्हणता? तुम्ही (उद्धव ठाकरे) ज्यावेळी त्यांना (एकनाथ शिंदे) बोलावलं होतं, त्यावेळी त्यांनी (एकनाथ शिंदे) मुख्यमंत्री पद नको म्हणून सांगितलं होतं,” अशा शब्दात केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

    follow whatsapp