नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात बुधवारी रात्री उशिरा गाजीपूर बॉर्डरवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलन करत असलेल्या भागातली लाईट कट केल्याचा आरोप पोलिसांवर केलाय. शेतकऱ्यांनी पोलिस आणि सरकारवर आंदोलनात अस्थैर्य निर्माण करण्याचा आरोप केला.
ADVERTISEMENT
दरम्यान, लाल किल्ला हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 37 शेतकरी नेत्यांविरुद्ध २२ एफआयआर नोंदवलेत. हिंसाचाराच्या घटनेनंतर दोन शेतकरी संघटनांनीही या आंदोलनातून काढता पाय घेतलाय.
शेतकरी नेते राकेश टिकैत मीडियाशी बोलताना म्हणाले, ‘प्रशासनानं आज वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केलाय. लाईट कट करण्यात आली. भीतीचं वातावरण तयार केलं जातंय. त्यामुळे आम्ही रात्र जागून काढण्याचा निर्णय घेतलाय. आमचं आंदोलन संपावं, असं प्रशासनाला वाटतंय.’
लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी टिकैत यांच्यासह जवळपास काही शेतकरी नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. यासंबंधी प्रश्न विचारला असता, आम्ही आंदोलन करतोय, तर मग आमच्यावर गुन्हा नोंदवला जाणार ना, असा म्हणत पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं तर नक्की तिथे जाऊत, असंही ते म्हणाले.
दुसरीकडे, लाल किल्ला हिंसाचारानंतर शेतकरी आपलं आंदोलन मागं घेणार का, याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यावरही टिकैत यांनी आंदोलन येत्या काळातही सुरूच राहणार असल्याचं स्पष्टीकरण दिलं.
लाल किल्ल्यावर जे काही झालं आणि ज्यांनी केलं त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. जे काही झालं आणि ज्यांनी केलं त्यांच्यासोबत आम्ही नाही. ट्रॅक्टर रॅलीचा जो मार्ग निश्चित करण्यात आला होता, त्या मार्गावर जाण्यापासून पोलिसांनी रोखलं, असा आरोपही टिकैत यांनी केला.
ADVERTISEMENT