सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आढळली डेंग्यूची अळी, महापालिका अॅक्शन मोडवर

मुंबई तक

• 04:54 AM • 26 Oct 2022

बॉलिवूडचा दबंग अभिनेता आणि भाईजान अशी ओळख असलेल्या सलमान खानच्या गॅलेक्सी या अपार्टमेंटमध्ये डेंग्यूचा लार्वा अर्थात डेग्यूची अळी आढळली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन सतर्क झालं आहे. त्यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेत उपाय योजना केल्या. काही दिवसांपूर्वीच सलमान खानला डेंग्यू झाला आहे. त्यात आता ही घटना घडली आहे. नेमकी काय माहिती दिली आहे महापालिकेने? सलमान […]

Mumbaitak
follow google news

बॉलिवूडचा दबंग अभिनेता आणि भाईजान अशी ओळख असलेल्या सलमान खानच्या गॅलेक्सी या अपार्टमेंटमध्ये डेंग्यूचा लार्वा अर्थात डेग्यूची अळी आढळली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन सतर्क झालं आहे. त्यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेत उपाय योजना केल्या. काही दिवसांपूर्वीच सलमान खानला डेंग्यू झाला आहे. त्यात आता ही घटना घडली आहे.

हे वाचलं का?

नेमकी काय माहिती दिली आहे महापालिकेने?

सलमान खान वांद्रे भागातल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याच्या घरात नाही मात्र त्याच्या इमारतीत दोन ठिकाणी डेंग्यूची अळी आढळली आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी डेंग्यूचा लार्वा आढळला आहे. डेंग्यूची ही अळी सापडल्याने महापालिकेने या ठिकाणी पोहचत लगेचच धूर फवारणी केली आहे.

सलमानच्या इमारतीत रोज येतं आहे मुंबई महापालिकेचं पथक

सलमान खानला डेंग्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई महापालिकेचं पथक गेल्या काही दिवसांपासून रोज या ठिकाणी औषध आणि धूर फवारणीसाठी येत असतं. इतर परिसरातही औषध आणि धूर फवारणी केली जाते. अशात आता सलमान राहतो त्याच इमारतीत डेंग्यूची अळी दोन ठिकाणी आढळली आहे.

सलमान खानला डेंग्यूची लागण

सलमान खानला डेंग्यूची लागण झाल्याची बातमी २२ ऑक्टोबरला समोर आली होती. सलमान खान आता या आजारातून हळू हळू बरा होतो आहे. मात्र त्याने शुटिंग आणि सगळे दौरे रद्द केले आहेत. आजारी असल्यानेच सलमान दिवाळीच्या एकाही पार्टीत दिसला नाही.

कोरोना डेंग्यू, मलेरियासारखा होणार म्हणजे काय Dr. Shashank Joshi काय म्हणतात?

रिपोर्ट्स नुसार सलमान खान गेल्या काही दिवसांपासून किसी का भाई किसी की जान या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी होता. मात्र याच दरम्यान त्याला डेंग्यूची लागण झाली आहे. सलमान खानची प्रकृती बिघडल्याने सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे.

सलमानचे चाहते चिंतेत

सलमान खानला डेंग्यू झाल्याने त्याचे चाहते चिंतेत आहेत. सगळे जण त्याच्यासाठी दुवा करत आहेत की त्याला लवकर बरं वाटू दे आणि सलमानचं वीक एंड का वारमध्ये पुनरागमन होऊ देत. सलमान खानचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खानने त्यांचं मनोरंजन करून तो वर्ग तयार केला आहे. अशात आता त्याला डेंग्यू झाल्याने चाहते चिंतेत आहेत. सलमानला आराम मिळावा म्हणून ते प्रार्थना करत आहेत.

डेंग्यू म्हणजे काय?

डेंग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून या तापाची लागण होते. हा एक विषाणूजन्य आजार आहे. एडिस इजिप्ती या डासामुळे हा रोग होतो. डेंग्यूलाच बोनब्रेक फिव्हर म्हणजेच हाडांमध्ये शिरणारा तापही म्हटलं जातं. कारण हा ताप आल्यानंतर अनेकांना हाडांच्या वेदनेचा आणि स्नायूंच्या वेदनांचा सामना करावा लागतो.

डेंग्यूमध्ये प्रामुख्याने दोन प्रकार असतात. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावी ताप असं म्हणतात. दुसऱ्या तापामुळे जिवाचा धोकाही असतो. रूग्णाचा जीव दगावण्याचाही धोका या तापामुळे असतो.

डेंग्यूची प्रमुख लक्षणं काय आहेत ?

थंडी वाजून ताप येणं हे डेंग्यूचं प्रमुख लक्षण आहे. मात्र डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावी ताप या दोन प्रकारांची काही वेगवेगळी लक्षणं आढळू शकतात. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर याबाबत माहिती देण्यात आली आहे.

अचानक ताप येणं, डोकं दुखणं, अंगदुखी, स्नायूंच्या वेदना, हाडांमध्ये वेदना होणं ही प्रमुख लक्षणं आहेत.

शरीरावर पुरळ येणं, नाकात पुरळ येणं अशीही लक्षणं दिसू शकतात. अशी लक्षणं दिसली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण ही गंभीर तापाची लक्षणं असू शकतात.

    follow whatsapp