सध्या महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अनेक शहरांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा, इंजेक्शनची कमतरता अशा गोष्टींमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून याचा फटका रुग्णांनाही बसत आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधले पॉवरफूल मंत्री ऑक्सिजन आणि इंजेक्शनचा साठा आपल्या जिल्ह्याकडे वळवत असल्याचा आरोप केला आहे. वसईत श्रमजिवी संघटनेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी फडणवीस बोलत होते.
ADVERTISEMENT
राज्यात ऑक्सिजन आणि इंजेक्शनची कमतरता पाहता केंद्राने गेल्या काही दिवसांमध्ये राज्याला ऑक्सिजनचा सर्वाधिक कोटा दिला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला दुप्पट ऑक्सिजनचा कोटा अलॉट झालाय. रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा साठाही महाराष्ट्राला मिळाला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचं वितरण योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे. परंतू दुर्दैवाने महाराष्ट्रात पॉवरफूल मंत्री आहेत तिकडे ऑक्सिजन आणि इंजेक्शनचा साठा चालला आहे. अशावेळी पालघर सारख्या आदिवासी जिल्ह्याला अनाथासारखी वागणूक मिळते आहे. १०० इंजेक्शन घ्या, ५० इंजेक्शन घ्या असं म्हणत या जिल्ह्यांना इंजेक्शन मिळत आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यातली रुग्णसंख्या किती आहे, ऑक्सिजन बेड किती लागणार या गोष्टींचा विचार केला जात नसल्याचं फडणीसांनी सांगितलं.
महाराष्ट्राला केंद्राकडून कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींचा पुरवठा, जाणून घ्या किती लसी मिळणार?
दरम्यान, महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. लॉकडाउनमुळे राज्यातली रुग्णसंख्या स्थिरावली असं सांगायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत. आपल्या भाषणात विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकल्यानंतर शेवटी मुख्यमंत्र्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला.
Break The Chain चे निर्बंध लादल्याने कोरोना महाराष्ट्रात रूग्णसंख्या स्थिरावली-मुख्यमंत्री
राज्यात लॉकडाउन लावण्याच्या आधी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत देवेंद्र फडणवीस आणि भाजपने लॉकडाउनला विरोध केला होता. “आतापर्यंत तुम्ही मला जे सहकार्य केलंत तसंच सहकार्य यापुढेही कराल अशी मला खात्री आहे. माझ्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवलात. मध्यंतरी तुम्हाला भडकावण्याचा प्रयत्न झाला, पण आता मला त्यावर काहीही बोलायचं नाहीये. आपल्या संवादामध्ये मी कधीही कुठेही राजकारण आणणार नाही. जाहीर सभेत मी जरुर राजकारण करेन. जे कोणी गैरसमज पसरवत आहेत त्यांच्यासाठी मी जाहीर सभा नक्की घेऊन उत्तर देईन पण सभा घेण्याची ही वेळ नाहीये”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला.
लसींचे दोन लाख डोस घेऊन जाणारा ट्रक आढळला बेवारस अवस्थेत, वाचा कुठे घडली घटना?
ADVERTISEMENT