भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर या दोघांच्याही ट्विटबाबत ठाकरे सरकारने गुप्तचर यंत्रणांना चौकशीचे आदेश दिले आहेत. या सरकारचं डोकं फिरलं आहे का? असा संतप्त सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन यासंदर्भात ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?
आता कुठे गेला तुमचा मराठीचा अभिमान? आता कुठे गेला तुमचा महाराष्ट्र धर्म? भारतरत्नांच्या ट्विटची चौकशी करणं हे प्रचंड निषेधार्ह आहे. आपल्या देशाला अशी रत्नं शोधूनही सापडणार नाही. तुम्ही अशा रत्नांच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत जे आपल्या देशाचा आवाज आहेत. महाविकास आघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? महाविकास आघाडी सरकारला या कृतीबद्दल नक्कीच लाज वाटली पाहिजे. आता सरकारचं मानसिक संतुलन ढळलं तर नाही ना? याच गोष्टीची चौकशी करणं बाकी आहे या आशयाचं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
काय आहे प्रकरण?
सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्यासह अनेक सिने कलाकारांना शेतकरी आंदोलनावरून सरकारला पाठिंबा देणारं जे ट्विट करावं लागलं त्यामागे केंद्र सरकारचा दबाव होता का? या गोष्टीची चौकशी आता केली जाणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे आश्वासन दिलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज झूम कॉलद्वारे अनिल देशमुख यांच्याशी संवाद साधला. या संवादात त्यांनी ही बाब अनिल देशमुख यांना सांगितली तसंच यासंदर्भातली चौकशी केली जावी अशीही विनंती केली. त्यानंतर गुप्तचर संस्थेमार्फत या गोष्टीचा तपास केला जाईल असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
ठाकरे सरकारच्या याच निर्णयावरून देवेद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकेचे बाण चालवले आहेत. ठाकरे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असाही प्रश्न त्यांनी त्यांच्या ट्विटमधून विचारला आहे.
ADVERTISEMENT