राहुल गांधींची सावरकरांवर टीका, पण अडकले उद्धव ठाकरे; देवेंद्र फडणवीसांनी गाठलं खिंडीत

मुंबई तक

• 12:00 PM • 08 Oct 2022

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विधानाने आधीच राजकीय संकटाचा सामना करत असलेल्या उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढलीये. राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)आणि वि. दा. सावरकरांवर टीका केलीये. गांधींच्या टीकेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना खिंडीत पकडलंय. एकनाथ शिंदेंसोबत राजकीय लढाई लढत असलेल्या उद्धव ठाकरेंना भाजपनंही घेरलंय. याला कारण ठरलंय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं विधान. […]

Mumbaitak
follow google news

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विधानाने आधीच राजकीय संकटाचा सामना करत असलेल्या उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढलीये. राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)आणि वि. दा. सावरकरांवर टीका केलीये. गांधींच्या टीकेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना खिंडीत पकडलंय.

हे वाचलं का?

एकनाथ शिंदेंसोबत राजकीय लढाई लढत असलेल्या उद्धव ठाकरेंना भाजपनंही घेरलंय. याला कारण ठरलंय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं विधान. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकरांवर टीका केली. राहुल गांधींनी सावरकरांवर गंभीर आरोप केलेत.

राहुल गांधींनी केलेल्या आरोपांमुळे भाजपला उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याची आयती संधीच मिळाल्याची चर्चा सुरू झाली आणि देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत ठाकरेंना खिंडीत गाठलं.

राहुल गांधींची सावरकरांवर टीका, फडणवीसांनी केला निषेध

देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, “काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केलाय. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल ते इंग्रजांचे हस्तक होते. ते इंग्रजांकडून पैसे घेत होते, अशा अनेक गोष्टी ते सावरकरांबद्दल बोलत आहेत”, असं त्यांनी सांगितलं.

“खरं म्हणजे राहुल गांधींचा मी निषेध करतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांना काँग्रेसनं यामुळे वारंवार अपमानित केलं, कारण सावरकरांच्या पाठिमागे मोठ्या प्रमाणात भारतातली जनता होती. स्वातंत्र्यानंतर जी राजकीय परिस्थिती होती, त्या परिस्थितीत जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपमानित करण्याचं काम काँग्रेसनं केलंय”, असा आरोप फडणवीसांनी केला.

सावरकरांनी क्रांतिकारकांना प्रेरणा दिली -फडणवीस

“११ वर्ष अंदमानच्या कालकोठडीत काळ्या पाण्याची शिक्षा त्यांनी भोगली. इतकी लांब शिक्षा भोगणारे फार थोडे स्वातंत्र्य संग्रामसैनानी आहेत. आमच्यासाठी सर्वच स्वातंत्र्यसैनिक हे महान आहेत. यामध्ये सावरकरांचं वेगळेपण हे आहे की, त्यांनी अनेक क्रांतिकारकांना त्यांना प्रेरणा दिली. क्रांतीची संपूर्ण चळवळ त्यांनी उभी केली. इंग्रजांचे अनन्वित अत्याचार सहन करून देखील अंदमानच्या कालकोठडीतही ते सातत्यानं भारतीय स्वातंत्र्याचाच विचार करत होते. त्याची काव्ये लिहित होते. तिथल्या कैद्यांना धीर देत होते”, असं म्हणत फडणवीसांनी राहुल गांधींचा निषेध केलाय.

देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना उद्देशून काय म्हणाले?

“स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान राहुल गांधी करतात, कारण राहुल गांधींना भारताचा इतिहासच माहिती नाही. त्यांना काँग्रेसचा इतिहास माहिती नाहीये. आम्ही त्यांचा निषेध करतो. माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा ते निषेध करणार आहेत की नाही. ही जी कुठली भारत जोडो की तोडो यात्रा त्यांनी सुरू केलीये. या यात्रेच्या स्वागतासाठी ते शिवसेनेचे नेते पाठवणार आहेत का आणि पाठवून राहुल गांधींनी जे विधान केलंय, त्याचं समर्थन ते करणार आहेत का याचं उत्तर आता कुठेतरी उद्धजींनी दिलं पाहिजे”, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना भूमिका मांडण्याचं आवाहन केलंय.

महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यापासूनच भाजप शिवसेनेला सावरकरांच्या मुद्द्यावरून लक्ष्य करत आलीये. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना का असा सवाल सातत्यानं भाजप नेत्यांकडून केला गेलाय. त्यातच आता राहुल गांधींनी नव्यानं सावरकरांवर टीका केल्यानं भाजपला पुन्हा एकदा ठाकरेंना घेरण्याची संधी मिळाल्याची बोललं जात आहे.

    follow whatsapp