नागपूर: ‘आज अनेकवेळा पक्षामध्ये, पक्षाबाहेर लोकं एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात. परंतु मला असं वाटतं की, राजकारणात आपण वैचारिक विरोधक असतो. विचारांचा विरोध असतो, व्यक्तीचा विरोध नसतो.’ असं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील लोकमत वृत्तपत्राच्या एका कार्यक्रमात केलं आहे.
ADVERTISEMENT
एकीकडे राज्यात गेल्या तीन वर्षांपासून राजकारणच बदलेलं आहे. राज्यातील राजकीय पक्षांमध्ये प्रचंड दुरावा वाढल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे शिवसेना पक्ष फुटल्याने राज्यातील राजकारण अधिकच ढवळून निघालं आहे. अशावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यातून त्यांना नेमकं दर्शवायचं आहे याबाबत मात्र आता चर्चा सुरू झाली आहे.
पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले:
‘वसंतराव नाईकांसोबत खूप चांगले संबंध जवाहरलाल दर्डा यांचे होते. पण नंतर काही कारणांमुळे जेव्हा त्यांना वेगळं व्हावं लागलं तेव्हा देखील खूपच सभ्यतेने त्यांनी एक अग्रलेख लिहला. ज्यामध्ये ऋणानुबंधाच्या तुटल्या गाठी अशा प्रकारचे शब्द वापरून.. त्या अग्रलेखातही वसंतराव नाईकांचीही त्यांनी स्तुती केली. त्यासोबत विचारांनी वेगळं झालो आहोत. पण मनाने नाही अशा प्रकारचा भाव सांगितला.’
‘आजच्या राजकारणात हे याकरिता महत्त्वाचं आहे की, आज अनेकवेळा पक्षामध्ये, पक्षाबाहेर लोकं एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात. परंतु मला असं वाटतं की, राजकारणात आपण वैचारिक विरोधक असतो. विचारांचा विरोध असतो, व्यक्तीचा विरोध नसतो.’
इंदिराजींनी ‘ती’ गोष्ट मोठ्या मनाने मान्य केली, फडणवीसांनी सांगितलेला तो किस्सा काय?
‘ज्येष्ठ समाजसेविका सीमाताई साखरे या मधुमालती नावाने लोकमतमध्ये एक सदर चालवायच्या. ज्यावेळी श्रीमती मेनका गांधी या इंदिराजींच्या घरून बाहेर पडल्या त्यावेळी सीमाताई साखरेंनी लोकमतमध्ये एक लेख लिहला आणि त्यात सुनेला बाहेर काढणारी खाष्ट सासू असं त्यांनी लिहलं आणि तो फोटो देखील छापला. तेव्हा जवाहरलाल हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, इतक्या मोठ्या पदावर असलेले. त्यावेळी इंदिराजी काँग्रेसच्या सर्वेसर्वा अशा परिस्थिती माखनलाल फोतेदारजी यांचा फोन आला. कारण शेवटी कोणतरी पाठवतंच. त्या बातमीची तेव्हा फॅक्स गेले,. ते इंदिराजींकडे गेलं. त्यामुळे इंदिराजींनी बाबूजींना बोलावून घेतलं आणि तो फॅक्स त्यांना दाखवला.’
‘बाबूजींनी त्यावेळी सांगितलं की, मी एक वृत्तपत्र चालवतो आणि वृत्तपत्राचा संपादक म्हणून माझी जबाबदारी आहे की, जे काही घडतं ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि माझ्या वृत्तपत्रात जे लिहितात त्याचं स्वातंत्र्य मी त्यांना दिलं आहे. कदाचित त्यांनी अशी भाषा त्यांनी नसती वापरली तर बरं झालं असतं. पण शेवटी त्यांना कुठली भाषा वापरायची आहे, त्यांना काय लिहायचंय. याचं सर्व स्वातंत्र्य मी त्यांना दिलं आहे. त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो की, आपण याकडे लक्ष देऊ नका. आपण फार मोठ्या आहात. त्यामुळे अशा बातमीने आपलं मोठेपण कमी होत नाही. यावेळी इंदिरांजींनी देखील ते मोठ्या मनाने मान्य केलं.’
‘परत आल्यावर बाबूजींना सीमाताई साखरे म्हणाल्या की, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. त्यावेळी बाबूजी असं म्हणाले की, माझ्या वृत्तपत्राकरिता आणि वृत्तपत्राच्या स्वातंत्र्याकरिता कितीही त्रास झाला तरी मी सहन करायला तयार आहे. पण त्या संदर्भात मी कुठलीही तडजोड मी निश्चितपणे करणार नाही.’ असा किस्सा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला आहे.
ADVERTISEMENT