महाराष्ट्रात प्रस्तावित असलेले मोठे प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानं शिंदे फडणवीस सरकार टिकेचं धनी ठरलंय. विरोधकांकडून होत असलेल्या टिकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिलं. त्यानंतर लागलीच आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीसांनी दाखवलेल्या सुभाष देसाईंच्या बातमीवरून आदित्य ठाकरेंनी लक्ष्य केलं.
ADVERTISEMENT
सुभाष देसाईंच्या बातमीचा मुद्दा काय?
महाराष्ट्रात येऊ घातलेला वेदांता फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेला. त्या प्रोजेक्टवरून झालेल्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी 2020 मधील एक बातमी दाखवली. ही बातमी फॉक्सस्कॉन प्रस्तावित महाराष्ट्रात प्रोजेक्ट उभारणार नाही, अशी होती. सुभाष देसाईंनी दिलेल्या माहितीची ही बातमी होती. फडणवीसांनी याच बातमीचा आधार घेत वेदांता फॉक्सकॉन प्रोजेक्ट महाविकास आघाडीच्या काळातच गेला होता, असं पत्रकार परिषदेत सांगितलं.
‘मी कधीही या राज्यात इतकं खोटं ऐकलं नव्हतं’, फडणवीसांचं नाव घेत आदित्य ठाकरे असं का म्हणाले?
‘आज मी कधीही इतकं खोटं बोललेलं या राज्यात ऐकलं नव्हतं जितकं त्या पत्रकार परिषदेत ऐकलं. मी असं म्हणणार नाही की उपमुख्यमंत्र्यांना खोटं बोलायचं होतं किंवा महाराष्ट्राची दिशाभूल करायची होती. कदाचित त्यांना चुकीची माहिती दिली गेली.’
‘उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एक देसाई साहेबांची बातमी दाखवली. फॉक्सकॉन महाराष्ट्रात युनिट उभारणार नाही, अशी. ही जानेवारी 2020 ची बातमी आहे. त्यांनी ही बातमी पूर्ण वाचली असती तर त्यांना कळलं असतं’, आदित्य ठाकरे म्हणाले.
‘हे वेदांता नाही फॉक्स्कॉन सोबत सही केलेला प्रोजेक्ट होता. फॉक्स्कॉनने तामिळनाडूत जागा बघितली आणि नंतर अमेरिकेत गेले. त्यामुळे एमआयडीसीतील त्यांची जागा गेली’, असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरेंनी फडणवीस यांना दिलं.
देसाईंच्या बातमीतील फॉक्सकॉनचा तो प्रोजेक्ट कोणता होता?
महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांता फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट गुजरातमध्ये होणार आहे. गुजरातमध्ये होणारा हा प्रोजेक्ट सेमी कंडक्टर निर्मिती संदर्भातील आहे. जो प्रोजेक्ट फॉक्सकॉनने महाराष्ट्रात सुरु करण्यास असमर्थता दर्शवली होती, तो आयफोनचे पार्टस असेम्बलिंगचा प्रोजेक्ट होता.
ADVERTISEMENT