दीपक सूर्यवंशी, प्रतिनिधी, कोल्हापूर
ADVERTISEMENT
धनंजय मुंडे यांनी सहा मुलं आणि बायका लपवल्या आहेत असा खळबळजनक आरोप करूणा शर्मा यांनी केला आहे. करूणा शर्मा यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. आज त्यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. त्यानंतर निवडणुकीत विजय आपलाच होईल असा विश्वासही व्यक्त केला.
नेमकं काय म्हणाल्या आहेत करूणा शर्मा?
”धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अनेक बायका आणि सहा मुलं लपवली आहेत. त्यामुळे आता त्यांना अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येणार आहेत. माझ्याकडे कायदेशीर पुरावे आहेत.” असा इशाराही करूणा शर्मा यांनी दिला आहे. करूणा शर्मा आणि माझे परस्पर सहमतीने संबंध होते हे धनंजय मुंडे यांनी मागच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यातच मान्य केलं आहे. तसंच त्यांच्या मुलांना आपण नाव देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र करूणा शर्मा यांच्याशी विवाह केल्याची माहिती दिलेली नाही. आता करूणा शर्मा या कोल्हापूरमधून पहिली पोट निवडणूक लढवत आहेत.
‘….तर धनंजय मुंडे आज तुरुंगात असते!’ करूणा शर्मा यांचं मोठं विधान
आणखी काय म्हणाल्या करूणा शर्मा?
१३ कोटी जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची माझी इच्छा आहे. महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणाबाबत मला काम करायचं आहे. कोल्हापुरात घराणेशाही आहे म्हणून विकास थांबला आहे. घराणेशाहीचं राजकारण संपवायचं असेल तर लोकांनी मला निवडून द्यावं असंही करूणा शर्मा यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर धनंजय मुंडे यांच्या अनेक बायका आहेत आणि सहा मुलं आहेत जी त्यांनी लपवली आहेत. अर्ज भरण्यासाठी त्यांना अडचण येईल मला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आमच्या दोघांच्या आयुष्यावर चित्रपट काढल्यास तो हिट होईल, असेही त्या म्हणाल्या होत्या. आज अर्ज भरल्यानंतर बोलताना त्या म्हणाल्या की, आमच्या प्रेमकहाणीवरील पुस्तक अंतिम टप्प्यात आहे. या पुस्तकातून मी अनेक पुरावे समोर आणणार आहे. या पुस्तकात आमची 25 वर्षांची कहाणी असेल. या पुस्तकात पुराव्यांसोबत आमच्या लग्नाचे फोटोही असतील. हे पुस्तक हिंदी भाषेत लिहून झाले असून, ते हिंदीसोबत मराठी भाषेतही असेल.
धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर करुणा शर्मा चर्चेत आल्या होत्या. आता त्यांनी थेट निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. कोल्हापूर उत्तरमधील पोटनिवडणुकीत करूणा शर्मा याच त्यांच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत. मागील काही दिवसांपासून पक्षातर्फे कोण उमेदवार असणार आहे, यावर विचार सुरू होता. अखेरीस करूणा शर्मा यांनीच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष स्थापन केल्यानंतर त्या थेट विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.
ADVERTISEMENT