मागच्या काही दिवसांपासून पडत असलेल्या परतीच्या पावसामुळं मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं हाता-तोडांशी आलेला घास हिरावला आहे. प्रामुख्यानं मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं आता आमदार धनंजय मुंडे हे शेतकऱ्यांच्या बाजुनं उभे राहिले आहेत. राज्य सरकारला शेतकऱ्यांची ही परिस्थिती पाहूनतरी पाझर फुटेल का, सरकारने अतिवृष्टीने ग्रासलेल्या या शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर न केल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT
धनंजय मुंडेंनी केली नुकसानीची पाहणी
धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यात पावसाने नुकसान केलेल्या वाघबेट, कौठळी, कौठळी तांडा, बेलंबा, इंजेगाव आदी गावांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पावसाने अक्षरशः कहर केला असून, कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिके संपूर्णतः वाया गेली आहेत. काही ठिकाणी नदी काठच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानेही नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य, किराणा, धान्य आदी नुकसान झाले असेल अशा कुटुंबांना तातडीने आकस्मिक निधीतून अर्थ सहाय्य देण्याच्या सूचना मुंडे यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना केल्या आहेत. तसेच शेतीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे तात्काळ पूर्ण करून शासनास पाठवावेत, अशाही सूचना त्यांनी केल्या.
नुकसान अतिवृष्टीच्या निकषांपेक्षा अनेक पटींनी जास्त : धनंजय मुंडे
शासकीय यंत्रणा या पावसाने केलेल्या नुकसानीला कोणत्या निकषात पाहतात माहीत नाही, मात्र या पावसाने झालेले नुकसान अतिवृष्टीच्या निकषांपेक्षा अनेक पटींनी जास्त आहे. मागील 15 दिवसात जिल्ह्यात जवळपास दररोज एक शेतकरी आत्महत्या करत आहे. यावर शासन प्रशासन कोणतीही उपाययोजना करू शकले नाही. शिरूर तालुक्यात 4 जणांचा पावसाच्या कहारामुळे मृत्यू झाला. आज परळी तालुक्यात एक युवकाचा पुरात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला. शासनाने याची दखल घेतल्याचे अजूनतरी दिसून आले नाही, हे दुर्दैवी असून राज्यात सरकार आहे तरी कुठे, असा संतप्त सवाल धनंजय मुंडे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
‘नुकसान पाहूनतरी सरकारच्या मनाला पाझर फुटणार का?’
मागील तीन महिन्यांच्या नुकसानीचे दोन वेगवेगळ्या मदतीचे जीआर आले, कोट्यावधी रुपयांच्या मदतीची घोषणा झाली पण त्यात बीड जिल्ह्यात नुकसान झालेच नाही, असा दावा करत सरकारने मदतीपासून बीड जिल्ह्याला वगळले, असा आरोप मुंडेंनी केला आहे. आता जे समोर दिसते आहे, ते नुकसान पाहूनतरी सरकारच्या मनाला पाझर फुटणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करत धनंजय मुंडे यांनी सरकारला तातडीने मदतीचा निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
शेतीचं नुकसान पाहून तर मन सुन्न होत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजा कोलमडून पडला आहे. राज्य सरकारने काल झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत अतिवृष्टी बाधित मराठवाडा व विदर्भासाठी काहीतरी ठोस निर्णय घेणे अपेक्षित होते, मात्र असे झाली नाही. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे, असं मुंडे म्हणाले.
ADVERTISEMENT