दिलीप वळसे पाटील हे आता महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री झाले आहेत. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले. हे सगळं प्रकरण हायकोर्टात गेलं होतं. बॉम्बे हायकोर्टाने अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यामुळे अनिल देशमुख यांना पद सोडावं लागलं. त्यांच्या जागी दिलीप वळसे यांना निवडण्यात आलं आहे. दिलीप वळसे पाटील हे अत्यंत संयमी आणि शांत स्वभावाचे आहेत. त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीवर जर नजर टाकली तर कोणत्याही वाद-विवादाशिवाय त्यांची कारकीर्द आत्तापर्यंत पार पडली आहे. त्यामुळेच त्यांनी निवड गृहमंत्री म्हणून झाली असावी हे आता दिसतंय.
ADVERTISEMENT
दिलीप वळसे पाटील आणि मी एकाच हॉस्टेलमध्ये वास्तव्य करत होतो. त्यांना महाविद्यालयीन जीवनापासून हा आत्मविश्वास होता की आपण राजकारणातच जाणार आहोत. राजकीय पक्षाचंच काम करणार आहोत हे त्यांचं ध्येय नक्की झालं होतं. शरद पवारांसोबतच काम करायचं असं काही तेव्हा त्यांनी निश्चित केलं नव्हतं. पण राजकारणात जाणार हे त्यावेळपासूनच त्यांनी नक्की केलं होतं. हॉस्टेलमध्ये असतानाही त्यांचे जे मित्र होते ते थोडीफार राजकीय पार्श्वभूमी असलेले होते. वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळी मुलं ही त्यांची त्या काळात मित्र होती आणि आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या घोळक्यातच दिलीप वळसे पाटील कायम असे. शासकीय विधी महाविद्यालयातील मुलंच कायम त्यांच्या अवतीभवती असायची. मी त्यावेळी इन्स्टिट्युट ऑफ सायन्समध्ये होतो. त्याकाळात मी महाविद्यालयीन कार्यक्रमात सक्रिय असे. त्यामुळे माझा आणि दिलीप वळसे पाटील यांच्याशी सतत संपर्क येत होता. तिथल्या स्टुडंट बॉडीचा मी अध्यक्ष आणि दिलीप वळसे पाटील हे उपाध्यक्ष होते. एक वर्ष आम्ही कामही केलं होतं.
दिलीप वळसे पाटील उत्तम संसदपटू होणं, ते कौशल्य त्यांनी आत्मसात करणं हे अत्यंत स्वाभाविक होतं. कोणतीही गोष्ट अभ्यास करूनच ते बोलत असत. आमचे अनेकदा वाद होत असत, राजकीय स्वरूपातल्या चर्चा आणि वाद होत असत. दिलीप वळसे पाटील हे कोणतीही मतं विना अभ्यास, विना वाचन व्यक्त करतच नसत. ते जसं बोलत असत ते कृतीत आणत असत. ज्यावेळी ते विधानसभेचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांना या आपल्या अभ्यासू स्वभावाचा प्रचंड फायदा झाला.
दिलीप वळसे पाटील गृहमंत्रीपदासाठी उत्सुक नव्हते
दिलीप वळसे पाटील हे काही गृहमंत्रीपदासाठी फार उत्सुक होते असं नाही. मात्र जी जबाबदारी मिळेल ती स्वीकारायची आणि ती अत्यंत चोखपणे पार पाडायची हा त्यांचा स्वभाव आहे. शरद पवारांवर त्यांची निस्सीम श्रद्धा आहे.
शरद पवारांनी त्यांना जर एखादी गोष्ट सांगितली तर ती ते तशी करणारच. ते जेव्हा राजकारणात प्रवेश करणार होते त्याआधी ते शरद पवारांचे स्वीय सहाय्यक होते. शरद पवारांनी त्यांना विचारलं होतं की तुला काय करायचं आहे? त्यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले की मला सामाजिक कार्य करायचं आहे. मग शरद पवारांनी त्यांना सांगितलं की तू आता काही नोकरी करू नकोस आणि तू तुझ्या मतदार संघात जा.
रामकृष्ण मोरे हे तेव्हा पोटनिवडणुकीसाठी उभे होते. त्यांच्या प्रचारासाठी दिलीप वळसे पाटील गावा-गावात आणि वाडी-वाडीत गेले. त्याचा त्यांना मतदारसंघ बांधण्यासाठी खूप फायदा झाला. त्यांची काम करण्याची एक पद्धत आहे. ते कुठलंही काम पूर्णपणे झोकून देऊन काम करतात. शरद पवारांनी जर त्यांना गृहमंत्रीपद सांभाळायचं आहे असं सांगितलं असेल तर ते या खात्याची जबाबदारी समर्थपणे पार पडतील.
राष्ट्रवादीचे संकटमोचक
लोडशेडिंगच्या काळात दिलीप वळसे पाटील यांच्यावर जेव्हा उर्जा खात्याची जबाबदारी देण्यात आली तेव्हा दिलीप वळसे पाटील यांनी नेमकी समस्या काय आहे याचा गाढा अभ्यास केला. त्यानंतर वीज मंडळाचं विभाजन करून त्याचे चार भाग केले. वीज मंडळातल्या कर्मचाऱ्यांनी त्यावेळी त्यांना विरोध दर्शवला होता तरीही अत्यंत हातोटीने त्यांनी हा सगळा विषय सांभाळला. आता नवी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना यासाठीच सोपवली आहे कारण त्यांनी वेगवेगळी खाती सांभाळली आहेत.
अनेकदा पोलिसांची पार्श्वभूमी फारशी बरी नसते असं माझं मत आहे. अशा काळात आणि जो काही गोंधळ परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे झाला ही सगळी परिस्थिती निस्तरण्यासाठी अत्यंत पात्र माणूस हवा होता. एक क्लिन चेहरा कोणत्याही वादात न अडकलेला चेहरा राष्ट्रवादीला हवा होता आणि हा गुण दिलीप वळसे पाटील यांच्यात आहे त्यामुळे ते गृहखातं अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. दिलीप वळसे पाटील हे कोणत्याही वादात पडत नाहीत. शरद पवारांचा हा गुण दिलीप वळसे पाटील यांनी अगदी व्यवस्थित आत्मसात केला आहे.
भाजप दिलीप वळसे पाटील यांना अडचणीत आणू शकतं का?
दिलीप वळसे पाटील यांना भाजप किंवा देवेंद्र फडणवीस हे अडचणीत आणू शकत नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. दिलीप वळसे पाटील यांचा जनसंपर्क खूप मोठा आहे त्यांचा मित्र परिवार खूप मोठा आहे. हे मित्र म्हणजे सगळे सोर्सेस असतात. त्या सोर्सकडून माहिती कशी मिळवायची आणि ती कशी कुठे वापरायची याची उत्तम जाण त्यांना आहे. एकदा दिलीप वळसे पाटील यांचा मित्र झाला की ते तो कायम त्यांचा मित्र असतो. एकेकाळी तो मित्र होता आणि मग तो नाही असं दिलीप वळसे पाटील यांच्याबाबतीत होतच नाही.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि आत्ता जे काही घडलं आहे त्या सगळ्या वातावरणात दिलीप वळसे पाटील उत्तम पद्धतीने गृहमंत्रीपद सांभाळू शकतील. अनिल देशमुख हेदेखील चांगले होते मात्र त्यांचा मित्र परिवार हा बहुतेक करून विदर्भातला होता. त्यांना इथल्या कार्यपद्धतीची माहिती नसावी त्यामुळे ते अडचणीत आले असतील असं मला वाटतं. दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः पत्रकारितेचाही अभ्यास केला आहे. त्यामुळे त्यांना जनसंवादाच्या कौशल्यांची चांगली जाण आहे. प्रसारमाध्यमांमध्येही त्यांची ओळख चांगल्या प्रकारे आहे. त्याचा त्यांना गृहमंत्री म्हणून फायदा होईल यात शंका नाही.
(धनंजय कर्णिक हे दिलीप वळसे पाटील यांचे जवळचे मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
ADVERTISEMENT