राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी
ADVERTISEMENT
भारतातील पश्चिम किनारपट्टीवरील ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटलाईट ट्रान्समीटर बसवण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांचे मार्ग निरीक्षण करण्यासाठी उपग्रहीय (सॅटेलाईट) टॅगिंगचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. वेळास आणि आंजर्ले येथून टॅग लावलेले कासव मंगळवारी समुद्रात सोडण्यात आले. त्यामुळे ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या स्थलांतरांचा अभ्यास होण्यास मदत होणार आहे.
वेळास येथून सोडण्यात आलेल्या कासवाला प्रथम असे नाव देण्यात आलं आहे. महाराष्ट्र वन विभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानतर्फे देहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थानच्या माध्यमातून राबवलेला भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील पहिला प्रकल्प आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास आणि आंजर्ले या दोन ठिकाणी हा उपक्रम यशस्वी झाला आहे.
सागरी कासवांच्या सात प्रजातींपैकी पाच भारतात आढळतात. त्यापैकी ऑलिव्ह रिडले ‘ ही प्रजाती कोकण किनारी आढळते. या प्रजातीतील कासवे दुर्मिळ होऊ लागल्यामुळे तिच्या बचावासाठी पुढाकार घेतला जात आहे. कोकणातील समुद्राच्या वाळूचे विशिष्ट तपमान या कासवांची अंडी उबविण्यासाठी मानवते. त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरपासून ती किनाऱ्यालगत प्रजननासाठी येतात. त्यांचा सविस्तर अभ्यास आजतागायत ऑलिव्ह रिडले कासवाचे टॅगिंगद्वारे फक्त भारताच्या पूर्वी किनाऱ्यावरच झाला.
महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रथमच वेळास येथे ऑलिव्ह रिडले कासवाला उपग्रहीय ( सॅटेलाईट ) टॅगिंग करण्याचा निर्णय महाराष्ट्र वन विभागाचे कांदळवन प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आला आहे. ऑलिव्ह रिडले कासवांच्या सागरी स्थलांतरण मार्गाचे उपग्रहीय निरीक्षण या वैज्ञानिक प्रकल्पाकरीता डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेची मदत घेण्यात आली आहे . कांदळवन प्रतिष्ठानने यासाठी सुमारे नऊ लाख रुपयांचे अनुदान दिले आहे. या अभ्यासातून ऑलिव्ह रिडले कासवांच्या पश्चिम किनाऱ्याजवळील सागरातील भ्रमणाबाबत माहिती मिळण्यास मदत होईल.
मंगळवार दि. 25 जानेवारी 2022 रोजी या उपक्रमातील पहिल्या दोन कासविणींना हे उपकरण बसवण्यात पथकाला यश आले आहे. वेळास व आंजर्ले येथील एक अशा दोना मादी कासवांना अशा प्रकारचे उपकरण (सॅटलाईट ट्रान्समीटर) लावून त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रथमच समुद्री कासवांना सॅटलाईट ट्रान्समीटर लावून त्यांचा स्थलांतराचा अभ्यास करण्यात येत आहे. हा अभ्यासप्रकल्प कांदळवन कक्ष, मँग्रोव्ह फाऊंडेशन आणि भारतीय वन्यजीव संस्थान मार्फत (डब्लूआयआय) राबविण्यात आला आहे. याअंतर्गत पाच मादी कासवांना सॅटलाईट ट्रान्समीटर लावण्यात येणार आहेत.
यामधील दोन कासवांना मंगळवारी मध्यरात्री सॅटलाईट ट्रान्समीटर लावण्यात आले. मंडणगड तालुक्यातील वेळासच्या किनार्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या ऑलिव्ह रिडले मादी कासवाला डब्लूआयआयचे शास्त्रज्ञ डॉ.आर.सुरेश कुमार यांच्या मार्गदर्शना अंतर्गत सॅटलाईट ट्रान्समीटर लावण्यात आले. दोन्ही कासवं समुद्रात सोडण्यात आली असून, या निमित्ताने कासव संवर्धनातील एका नवीन पर्वाला सुरवात झाली आहे . कांदळवन प्रतिष्ठान आणि भारतीय वन्यजीव संस्थानतर्फे रायगड , रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील पाच ठिकाणांवरील विविध रिडले कासवांना टॅग लावले जाणार आहे.
ADVERTISEMENT