शिवसेना आणि भाजपमधलं गांजा पुराण संपता संपत नाहीये. याचं कारण आहे सामना आणि तरूण भारतमधले अग्रलेख. शिवसेनेचा दसरा मेळावा शुक्रवारी पार पडला. त्यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ज्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या मेळाव्यातील टीकेला उत्तर दिलं.
ADVERTISEMENT
यावर सामनामध्ये अग्रलेख लिहून कमी प्रतिचा गांजा असं शीर्षक देण्यात आलं होतं. त्यात भाजपचा उपहास करण्यात आला. आता या अग्रलेखाला तरूण भारतच्या अग्रलेखातून गांजा कुणी ओढला अशा मथळ्याने अग्रलेख लिहून उत्तर देण्यात आलं आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतलं गांजा पुराण संपता संपत नाही असं दिसून येतं आहे.
Shiv Sena dussehra Melava: दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तुफान फटकेबाजी, पाहा महत्त्वाचे मुद्दे
काय आहे तरूण भारतचा अग्रलेख?
संविधान, लोकशाही आणि कायदा जणू आपणच पाळतो, अशा आविर्भावात अलीकडे काही लोक वागू लागले आहेत. ज्यांना चटके बसले, तेच आज आरोप करताना पाहून तर अधिकच हसू येते. शरद पवारांकडे विधानसभेत पूर्ण बहुमत होते. पण, केवळ आलिया मना म्हणून 17 फेब्रुवारी 1980 रोजी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. सातत्याने रडगाणे गाण्याऐवजी पक्षप्रमुखांनी राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी झटले पाहिजे. परंतु, दुर्दैवाने ते केंद्र सरकारविरुद्ध ओरड करतात आणि स्वत:ची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात. हा अनुभव आपण सगळेच दररोज घेत आहोत.
अतिवृष्टीमुळे राज्यात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. या शेतक-याला तातडीने मदत देऊन त्याचे मनोबल वाढविण्याची आवश्यकता असताना राज्यातील सत्ताधारी केंद्राकडे बोट दाखवून बेजबाबदारपणे वागत आहेत. ‘खासदार संपादक’ असलेला नेता सल्ला देतो. वायफळ बडबड करतो आणि पक्षप्रमुख त्यांचीच री ओढतात, हे योग्य नाही.
शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, ही बाब मान्य केली तरी जनतेने नाकारल्यानंतरही त्यांचा पक्ष नीतिमत्ता गुंडाळून ठेवत सत्तेवर आला आहे, याचा पवारांना सोयीस्कर विसर पडला आहे. देवेंद्र फडणवीसांबाबत काहीही बोलण्याचा नैतिक अधिकार शरद पवारांना नाही. एवढी वर्षे सत्तेत राहूनही त्यांना सत्तेचा मोह आवरत नाही, हे त्यांच्या वागण्या-बोलण्यावरून स्पष्ट झाले आहे. भारतात आजवर किमान १२० वेळा विविध राज्यांतील सरकारे केवळ केंद्रातील सरकारच्या मनात आले म्हणून बरखास्त करण्यात आली. क्षणोक्षणी लोकशाहीचे मुडदे पाडणा-यांनी जेव्हा असे आरोप करायचे चालविलेले असते, तेव्हाच मनात प्रश्न येतो; ‘गांजा कुणी कुणी ओढला?’
आता अनेकांना गांज्याच्या गुणवत्तेचाही अभ्यास झालेला आहे. आम्हाला तो नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करता येणार नाही. पण, एक मात्र नक्की की, विरोधकांचे ‘दम मारो दम’ हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विजयादशमीच्या भाषणामुळे खचितच नव्हते. कारण ते भाषण तर नव्या बाटलीतील जुनी दारू याच शैलीतील होते. एक मात्र नक्की, जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात की, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री झालो आणि दुस-याच दिवशी शरद पवार सांगतात की, त्यांना मुख्यमंत्री व्हायचेच नव्हते; मीच बळजबरीने हात वर केला… तेव्हा गांजा न ओढताही आपोआपच नशा चढते. आता या दोघांपैकी कोण खरे बोलतो आहे, याचे उत्तर मिळायलाच हवे. उद्धव ठाकरेंना वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे होते, तर एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री का झाला नाही, हा प्रश्न जेव्हा विचारला जातो, तेव्हा लोकशाही रक्षणाच्या नावाने गळा काढणारेच म्हणतात, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील हे प्रश्न विचारणारे कोण? अरे बाबा, एक विरोधी पक्षनेते आणि दुसरे एका राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी नाही तर कुणी हे प्रश्न विचारायचे? अशावेळी मनात पुन्हा प्रश्न येतो की, ‘गांजा कुणी कुणी ओढला?’
केंद्रीय संस्थांच्या कारवायांवर यांचा कायम आक्षेप आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जेव्हा म्हणतात की, या सरकारच्या मंत्र्यांकडे वसुलीचे सॉफ्टवेअर आहे, तेव्हा ते हवेत तीर मारणारे नेते नाहीत. अतिशय जपून ते शब्द वापरतात आणि जोवर हाती पुरावा येत नाही, तोवर हे बोलत नाहीत. दररोज सकाळी निव्वळ शब्दांची फेकाफेकी करणारे ते नेते नाहीत. आम्ही त्यांना ओळखतो. त्यामुळे हे सॉफ्टवेअर लवकरच महाराष्ट्रातील नागरिकांपुढे येईल आणि त्या मंत्र्यांचेही नाव कळेल, याची आम्हाला आणि महाराष्ट्रालाही खात्री आहे. ईडीच्या केसेस ज्या-ज्या नेत्यांविरोधात आहेत, ते थेट आपली बँक खाती आणि सारी कागदपत्रे घेऊन ईडीच्या कार्यालयात धडक का देत नाहीत? उगाच जर ईडी त्यांना त्रास देते आहे, तर खा. भावना गवळी, अनिल परब, अनिल देशमुख यांनी एकत्रित येऊन ईडीच्या कार्यालयात जावे आणि ‘दूध का दूध, पानी का पानी’ करून यावे. असे केल्याने त्यांचे स्वच्छ चारित्र्य आणि निर्दोषित्व आपोआपच सिद्ध होईल. केंद्र सरकार यंत्रणांचा गैरवापर करतेय्, हेही सिद्ध होईल. पण, असे न करता केवळ रडत बसले की, आम्हाला पुन्हा प्रश्न पडतो की, ‘गांजा कुणी कुणी ओढला?’
या राज्यातील मंत्री एखाद्या कार्यकत्र्याला बेदम मारहाण करतात आणि दीड वर्षांनी त्यांना लोकशाही मूल्यांचे पालन करीत अटक होते. पण, अटक कशी तर जामिनाची कागदपत्रे हातात घेऊनच! फार कुठे त्याच्या बातम्याही होत नाहीत. दुसरे मंत्री भाजपाच्या कार्यकत्र्यांचा ऊससुद्धा खरेदी करीत नाही. एक मंत्री तर म्हणतात की, दोन-तीन ग्रॅम गांजा असेल तर कारवाई करायची गरज नाही. आम्हाला काही वाचकांकडून विचारणा झाली की, मोठ्ठी घरफोडी केली आणि लाखोंचा ऐवज न नेता केवळ काही हजारांचीच चोरी केली तर घरफोडीचा गुन्हा दाखल होणार नाही का? आता अशा प्रश्नांची उत्तरं वकीलच देऊ शकतात. पण, आमच्या मनात पुन्हा प्रश्न येतो, ‘गांजा कुणी कुणी ओढला?’
काय होतं सामनाच्या अग्रलेखात?
भाजपने बेंबीच्या देठापासून बोंबा मारायला सुरुवात केली आहे. फडणवीस यांनी तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच कसे अशी अलोकशाही भूमिका घेऊन मनातली भडास बाहेर काढली. उद्धव ठाकरे यांनी एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करु असे सांगितले होते पण ते स्वतःच झाले, पण असा आक्षेप घेणारे फडणवीस आणि चंद्रकांत पाटील कोण? उद्धव ठाकरे हे शिवसैनिक आहेत ते काही परकीय देशातील राजकीय पक्षाचे सदस्य नाहीत. मुख्यमंत्र्यांनी लाखोंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर वाजत गाजत शपथ घेतली. लोकं झोपेत आणि गुंगीत असताना लपून-छपून कड्या-कुलपात शपथ घेतली नाही हे काय विरोधी पक्ष नेत्यांना माहिती नाही?
भाजपचे लोकं दसरा मेळाव्यानंतर ज्या पद्धतीने भाजपचे लोकं शिमगा करत आहेत, बेताल आरोप करत आहेत ते बरं नाही. ही लोकं नशेत वगैरे बोलत आहे का याचा तपास व्हावा. भाजपने महाराष्ट्रातली सत्ता गमावून दोन वर्ष झाली, त्या धक्क्यातून त्यांनी आता सावरायला हवं. एक आण्याचा गांजा मारला की भरपूर कल्पना सूचतात असं लोकमान्य टिळक उपहासाने बोलले होते. आजही भाजप नेत्यांची जी भन्नाट मुक्ताफळे आणि शिमगोत्सव सुरु आहे त्यामागे लोकमान्यांना सांगितलेले गांजापुराण आहे काय? NCB ने याचा तपास करावा अशी टीका सामनाच्या अग्रलेखात करण्यात आली होती.
ADVERTISEMENT