अहमदनगर जवळच्या शेवगावमध्ये एका डॉक्टरने दारू प्यायल्याने कोरोना बरा होतो असा दावा केला होता. या डॉक्टरला जिल्हा प्रशासनाने नोटीस पाठवल्यानंतर मात्र या डॉक्टरने आपला दावा मागे घेतला आहे. एकीकडे महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. मृत्यू होत आहेत, कोरोना रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. ऑक्सिजनची कमतरता भासते आहे. या सगळ्याला अहमदनगर जिल्हाही अपवाद नाही. अशात इथल्या शेवगावमध्ये काम करणाऱ्या डॉ. गणेश भिसे यांनी असा दावा केला की दारूचा एक डोस दिल्याने कोरोना बरा होता.
ADVERTISEMENT
मृतदेहांमधून कोरोना पसरू शकतो, कसे केले जावेत अंत्यसंस्कार?
डॉक्टरांनी Whats App च्या माध्यमातून केलेला हा दावा व्हायरल झाला. शेवगाव तालुक्यातल्या अनेकांनी डॉक्टरांनी केलेला हा दावा एकमेकांना फॉर्वर्ड केला. गणेश भिसे यांनी यामध्ये असं म्हटलं होतं की ‘देशी दारूचा 30 मिली. चा डोस देऊन मी कोरोना रूग्णांना बरं केलं आहे. मला दारूच्या व्यसनाचं समर्थन करायचं नाही मात्र आत्तापर्यंत मी 50 हून जास्त कोरोना रूग्णांना बरं केलं आहे. 30 मिलीचा एक डोस कोरोनावर पुरेसा आहे’ डॉक्टरांनी केलेला हा दावा व्हॉट्स अॅपवर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. अगदी तहसीलदार कार्यालयापर्यंत गेला. डॉ. भिसे यांनी हे पण म्हटलं होतं की मी हे अनुभवावरून सांगतो आहे. तसंच माझा दावा मी सिद्धही करू शकतो असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
रुके न तू थके न तू….कोरोना वॉरियर्सचं मनोबल वाढवण्यासाठी बिग बी पुढे सरसावले
डॉ. गणेश भिसे हे शेवगावच्या कोव्हिड सेंटरमध्ये काम करतात. त्यांनी केलेला हा दावा जेव्हा तहसीलदार कार्यालयापर्यंत पोहचला तेव्हा तहसीलदार अर्चना भाकडे यांनी एक नोटीस त्यांच्याविरोधात जारी केली आणि तुम्ही जो दावा केला आहे की देशी दारूचा डोस घेतल्याने कोरोना बरा होतो त्याचं स्पष्टीकरण द्या असं म्हटलं. ज्यानंतर गणेश भिसे यांनी स्वतः केलेला दावा मागे घेतला. तसंच मी माझा दावा मागे घेत आहे असं म्हणत व्हॉट्स अॅपवर नवी पोस्ट लिहिली. जेव्हापासून गणेश भिसे यांनी हा दावा केला आहे तो त्यांनी मागे घेतल्यापासून त्यांनी आपला फोन बंद केला आहे.
शेवगावच्या सरकारी ग्रामीण रूग्णालयात काम करणाऱ्या डॉ. सलमा हिरानी यांच्याशी मुंबई तकने संवाद साधला त्यावेळी त्या म्हणाल्या की डॉ. गणेश भिसे हे एम.बी. बीएसची पदवी घेतलेले डॉक्टर आहेत. मात्र दारू प्यायलाने कोरोना बरा होतो हा जो दावा त्यांनी केला आहे त्याला काहीही अर्थ नाही. उलट कोरोना रूग्णाने दारू प्यायली तर त्याला हानी होऊ शकते असंही सलमा हिरानी म्हणाल्या. तसंच डॉ. भिसे यांचा दावा त्यांनी खोडून काढला आहे.
ADVERTISEMENT