गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अल्पवयीन मुली, महिला यांच्यावर बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वीच समोर आलेली डोंबिवली येथील सामूहिक बलात्काराची घटना तर अत्यंत धक्कादायक म्हणावी अशीच आहे. डोंबिवलीतल्या एका अल्पवयीन मुलीवर 33 जणांनी बलात्कार केला. या सगळ्या प्रकरणात आरोपी विजय फुके हा मुख्य आरोपी आहे. त्याची आणि या पीडितेची ओळख इंस्टाग्रामवरून झाली होती. यानंतर अश्लील व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देत या पीडितेवर 33 जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने 27 वर्षांपूर्वी घडलेल्या जळगाव सेक्स स्कँडलची वाईट आठवण पुन्हा एकदा महाराष्ट्राला झाली आहे.
ADVERTISEMENT
काय घडलं होतं 27 वर्षांपूर्वी जळगावमध्ये?
1994 मध्ये जळगाव शहराची राज्यभरात चर्चा झाली होती. याचं कारण होतं कथित सेक्स स्कँडल. त्यावेळी काही राजकीय मंडळींनाही या प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला होता. जळगावमध्ये घडलेल्या या सेक्स स्कँडलमुळे सगळं राज्य आणि सगळा देश हादरला होता. या प्रकरणात बहुतांश शाळकरी मुली आणि महाविद्यालयीन मुली अडकल्या होत्या. त्यांना आमीष दाखवून, गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर बलात्कार करण्यात आले. त्यानंतर त्यांचे नग्न अवस्थेत फोटो काढले जात आणि त्यांना ब्लॅकमेल केलं जात असे.
काय होती मोडस ऑपरेंडी?
कॉलेज कॅम्पस, ब्युटी पार्लर आईस्क्रिम पार्लर, बस स्थानक या ठिकाणी येणाऱ्या शाळकरी विद्यार्थिनी, महाविद्यालयीन तरूणी आणि महिलांवर नजर ठेवली जात असे. त्यातलं ‘सावज’ हेरून त्यांना गुंगीचं औषध देऊन त्या मुलीवर/महिलेवर अत्याचार केले जात असत. या तरूणींना नंतर मोठमोठे व्यापारी, राजकारणी अशा उच्चभ्रू लोकांशी शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडलं जात असे.
हा प्रकार उघडकीस कसा आला?
लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग याला कंटाळून काही पीडित तरूणींनी हिंमत दाखवली आणि पोलिसात तक्रार दाखल केली. हे स्कँडल साधारण तीन ते पाच वर्षे सुरू होतं. या स्कँडलमध्ये साधाऱण 300 ते 500 महिला अडकल्याचं त्यावेळी बोललं गेलं होतं.
अनेकींचं शोषण पण काहीजणींनीच दाखवली हिंमत
जळगावच्या सेक्स स्कँडलमध्ये अनेक मुली, महिला यांचं शोषण झालं. यातल्या अनेक मुली या पाच ते बारा या वयोगटातल्या होत्या. मात्र या सगळ्यांनी समोर येण्याची हिंमत दाखवली नाही. या प्रकरणाचा तपास अरविंद इनामदार, मीरा बोरवणकर आणि दीपक जोग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास समितीकडे देण्यात आला होता. पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करून न्यायाधीश मृदुला भाटकर यांनी सुनावणी घेतली.
जळगाव आणि भुसावळ या दोन शहरांमध्ये मिळून 12 बलात्कार आणि 20 लैंगिक अत्याचाराचे गुन्हे नोंदवले गेले. मात्र प्रत्यक्षात यापेक्षा अधिक महिला, मुली यांचं लैंगिक शोषण झालं होतं. मुलींना हेरायचं, त्यांना गुंगीचं औषध द्यायचं त्यानंतर त्यांचे नग्न अवस्थेत फोटो काढायचे आणि त्यानंतर ब्लॅकमेल करून त्यांना बडे व्यावसायिक, राजकारणी, डॉक्टर यांच्याशी संबंध ठेवण्यास भाग पाडलं जात असे. अत्यंत भयंकर अशा या स्कँडलमध्ये राजकारणी, डॉक्टर, वकील अशा समाजातल्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या वर्गाचे हात बरबटलेले होते.
तक्रारी उशिरा नोंदवल्या गेल्या हा या सेक्स स्कँडलमधला मुख्य अडसर ठरला. FIR दाखल होऊन खटला सुरू होईपर्यंत वर्ष निघून गेलं. त्यामुळे वैद्यकीय अहवालांची कमतरता होती. याची आम्हाला कल्पना असूनही आम्ही कोर्टात गेलो असं त्यावेळी मीरा बोरवणकर यांनी म्हटलं होतं.
डोंबिवली Gang Rape : सोशल मीडियावरून झाली होती आरोपींची ओळख, पोलिसांची माहिती
पोलीस जेव्हा या प्रकरणाचा तपास करत होते तेव्हा पोलिसांना तरूणींचे आक्षेपार्ह फोटो सापडले होते. 1997 ला पाच प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाली. 2000 मध्ये मुख्य आरोपी आणि काँग्रेस नेता पंडित सपकाळे याची सुटका केली. तोपर्यंत त्याने चार वर्षांचा कारावास भोगला होता. सपकाळे विरोधातले पुरावे नैसर्गिक आणि विश्वसनीय नसल्याचं हायकोर्टाने म्हटलं होतं. पंडित सपकाळे याच्या सुटकेनंतर हजारो महिलांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. सपकाळेला जळगावात प्रवेश दिला जाऊ नये अशी लेखी मागणी करण्यात आली होती. त्याचा प्रतीकात्मक पुतळाही जाळण्यात आला. हे प्रकरण समोर आल्यानंतर आणि एक एक गोष्टी उघड होऊ लागल्यानंतर हे प्रकरण दाबून टाकण्याचा खूप प्रयत्न झाला.
स्त्री संघटनांची आंदोलनं
त्या काळी हे प्रकरण समोर आल्यानंतर स्त्री संस्थांनी, संघटनांनी या घटनेच्या विरोधात प्रचंड निदर्शनं झाली होती. जळगावचं सेक्स स्कँडल उघडकीस आल्यानंतर भुसावळ, मालेगाव, सावंतवाडी या शहरांमध्येही असेच प्रकार घडल्याचं समोर आलं होतं. तो काळ सोशल मीडिया नसणारा काळ होता. तरीही त्या काळात या प्रकरणाची चर्चा राज्यभर, देशभर झाली होती.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी प्रकरणी ‘नारी समता मंचा’तर्फे अनेकदा जळगावचे दौरे केले. असंख्य पालक, विद्यार्थिनी, श्रोते यांच्यापुढे त्यांनी प्रश्न उपस्थित केले की, जळगावमधल्या मुलींबाबात जे घडलं ते आपल्या मुलींबाबत घडलं तर आपण कसे वागू? आपण तिला आधार देऊ का टाकून देऊ? बलात्कारानं स्त्री दुखावते, पण भ्रष्ट होत नाही हे आपण मानणार की नाही? योनिशुचितेचा आग्रह धरणाऱ्या पुरुषप्रधान व्यवस्थेला आपण प्रतिप्रश्न करणार की नाही?
विद्या बाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या यांनी 1995 ला उपस्थित केलेले प्रश्न
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी प्रकरणी ‘नारी समता मंचा’तर्फे अनेकदा जळगावचे दौरे केले. असंख्य पालक, विद्यार्थिनी, श्रोते यांच्यापुढे त्यांनी प्रश्न उपस्थित केले की, जळगावमधल्या मुलींबाबात जे घडलं ते आपल्या मुलींबाबत घडलं तर आपण कसे वागू? आपण तिला आधार देऊ का टाकून देऊ? बलात्कारानं स्त्री दुखावते, पण भ्रष्ट होत नाही हे आपण मानणार की नाही? योनिशुचितेचा आग्रह धरणाऱ्या पुरुषप्रधान व्यवस्थेला आपण प्रतिप्रश्न करणार की नाही? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा होता. कारण लैंगिक अत्याचार बाईवर होतात आणि त्यात बाईलाच बदनाम केलं जातं, अत्याचार करणारे नराधम मात्र मोकाट उजळ माथ्याने जगू शकतात.अन्यायग्रस्त तरुणींशी बोलून अनेक स्त्री कार्यकर्त्यांनी त्यांना धीर देण्याचं मोलाचं काम त्यांनी केलं.
डोंबिवलीत आज एका मुलीसोबत जे मागचे आठ महिने घडलं ते तिने हिंमत करून तिच्या आईला सांगितल्याने समोर आलं. त्या काळात अनेक मुली, महिला बदनामीच्या भीतीने समोरच आल्या नाहीत. त्या पीडित होत्या आणि पीडितच राहिल्या. आज घडीला डोंबिवलीत घडलेल्या या घटनेने त्या काळी घडलेल्या भयंकर स्कँडलच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
ADVERTISEMENT